
पणजी :- मडगाव स्थानकाहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ‘मांडवी एक्सप्रेस’च्या एका डब्याला आग लागल्यामुळे खळबळ माजली. ही घटना सावंतवाडी रोड स्टेशनपासून अर्धा कि. मी. अंतरावर घडली. ही गाडी सावंतवाडी स्थानकात थांबवून कोकण रेल्वेच्या कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मडगाव येथून मुंबईच्या दिशेने आज सकाळी निघालेली ‘मांडवी एक्सप्रेस’ मडुरे स्थानकावर पोहोचली. तिथून ती सावंतवाडीच्या दिशेने निघाल्यानंतर सावंतवाडी स्थानक अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असताना जनरेटर कार, दिव्यांग व गार्डसाठीच्या शेवटच्या डब्याच्या खालून आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या. त्यामुळे सावंतवाडी स्थानकावर गाडी आणून थांबवण्यात आली. या डब्यातील रेल्वे कर्मचार्यांनी स्थानकावरील अधिकार्यांना आगीची माहिती दिली. डब्यातील प्रवाशांनी घाबरून प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. त्यानंतर अग्निशमनासाठी वापरण्यात येणार्या बॉटल्स वापरून आगीवर नियंत्रण आणण्यात आले.
रेल्वेच्या डब्याला असलेल्या डिस्क ब्रेकमधील पॅड जळाल्याचा वास आल्याने ब्रेकमधील काही तांत्रिक कारणांमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमनच्या सहा बॉटल्स आतापर्यंत वापरण्यात आल्या. गाडीची चाके थंड झाल्यावर एका तासानंतर गाडीने मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.
जाहिरात
