राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनप्रसंगी प्रक्षोभक घोषणा: चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल…

Spread the love

रत्नागिरी शहरातून दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वयंसेवकांचे संचलन करण्यात आले. या प्रसंगी काही तरुणांनी एका माजी नगरसेवकाच्या सूचनेवरून प्रक्षोभक घोषणा दिल्या, असा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला…

रत्नागिरी: विजयादशमीच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनप्रसंगी प्रक्षोभक घोषणा दिल्याच्या आरोपावरून चौघाजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, रत्नागिरी शहरातून दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वयंसेवकांचे संचलन करण्यात आले. या प्रसंगी काही तरुणांनी एका माजी नगरसेवकाच्या सूचनेवरून प्रक्षोभक घोषणा दिल्या, असा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि धार्मिक तेढ वाढवल्याबद्दल कारवाई केली पाहिजे, या मागणीसाठी संघटनेचे कार्यकर्ते शहर पोलीस स्थानकात गोळा झाले. पोलिसांनी ही मागणी मान्य करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरा सुरू केली होती.




दरम्यान, रात्री उशिरा दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते कोकण नगर परिसरात जमल्याने मोठा तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आणखी बिघडू दिली नाही. त्यानंतर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात ठिय्या मांडून बसले. शनिवारी पहाटे चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर सर्व आंदोलक घरी परतले.

दरम्यान, असे प्रकार वारंवार घडत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिला आहे. यावेळी पोलीस स्थानकात माजी आमदार बाळ माने, शहराध्यक्ष फाळके, सचिन वहाळकर, दीपक पटवर्धन यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशात सर्वत्र संचलन आयोजित केले जाते. त्यामुळे रत्नागिरी शहरातही ते होते. मात्र, यंदाच्या वर्षी प्रथमच मुस्लिमबहुल कोकणनगर भागातून हे संचलन झाले, अशीही माहिती पुढे आली आहे. शनिवारी कोकण नगर येथे याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच दोन्ही समाजाला शांततेचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page