
लोहारा /प्रतिनिधी उत्तरेश्वर उपरे : मला फोनवर न बोलता, फोन का कट केलास म्हणत डॉक्टर व कर्मचाऱ्यास लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरूवारी (दि.७) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली असून यामध्ये डोक्यात मार बसल्याने गंभीर जखमी कर्मचाऱ्यास उपचारासाठी धाराशिव येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश अशोक मुंडे हे नेहमीप्रमाणे आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होते. दरम्यान, गावातील अक्षय गोपाळ दंडगुले याने डॉ. मुंडे यांच्या मोबाईलवर फोन करून तु कोण बोलतोयस असे म्हणून विचारले असता डॉ. मुंडे यांनी मी डॉक्टर आहे तुम्हाला कोण पाहिजे असे विचारले त्यांना दंडगुले याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा डॉक्टरांनी फोन कट करुन ते रुग्ण तपासणी करत बसले.
यावेळी दंडगुले हा जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला. त्याने डॉ. मुंडे यांच्या गच्चीला धरून तु माझा फोन का कट केलास म्हणून त्यांना शिविगाळ करत मारहाण करण्यास प्रारंभ केला.यावेळी दवाखान्यातील कर्मचारी धनु जाधव यांनी मध्यस्थी करीत सोडवा सोडवी केली व दंडगुले यास बाहेर घेऊन गेले. त्यानंतर डॉ. मुंडे हे रुग्ण तपासणी खोलीत येऊन बसल्यानंतर थोड्या वेळाने अक्षय दंडगुले याने हातात लाकडाची काठी घेऊन येऊन डॉ. मुंडे यांना मारण्यास सुरुवात केली, यावेळी कर्मचारी निलप्पा बसवंत बिराजदार हे भांडण सोडविण्यासाठी आले असता दंडगुले याने बिराजदार यांच्या डोक्यात काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून सोडवा सोडव केली.
परंतु, आरोपी दंडगुले हा दवाखान्याच्या बाहेर उभारुन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तुम्हाला बघून घेतो, तुम्ही दवाखान्याच्या बाहेर तरी या असे म्हणून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्यानंतर डॉ मुंडे व कर्मचारी बिराजदार यांना उपचारासाठी लोहारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कर्मचारी बिराजदार यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झालेली असल्याने त्यांना उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. याप्रकरणात डॉ गणेश मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय दंडगुले याच्याविरुद्ध कलम ३५३, ३३२, ३२४, ३२३, ५०४,
५०६, भादवी नुसार लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.