रत्नागिरी, दि. 9 (जिमाका) : – मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन असल्याने राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जंतनाशक मोहीम कार्य दल समितीची सभा काल झाली.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले आदी उपस्थित होते.
मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेचे 1 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालके, पाहिली ते बारावीतील शाळेत जाणारी सर्व मुले-मुली तसेच 6 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत न जाणारी सर्व मुले-मुली लाभार्थी असणार आहेत. ज्या मुला-मुलींना 13 फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी दिली नसेल, त्यांना 20 फेब्रुवारी रोजीच्या मॉप-अप दिनी गोळी देण्यात येणार आहे.