अशोक चव्हाण अन् भाजपला मोठा धक्का:भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजपला दिली सोडचिठ्ठी…

Spread the love

नांदेड/मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा व मीनल पाटील खतगावकर यांनीही काँग्रेसमध्ये घरवापसी केली. यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.

भास्करराव पाटील खतगावकर हे अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपची हाराकिरी झाल्यानंतर आता त्यांनी पुन्हा काँग्रेसचा ‘पंजा’ हातात घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबई स्थित टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात भास्करराव पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा मीनल पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सूनेसाठी हवी नायगाव विधानसभेची उमेदवारी…

सूत्रांच्या माहितीनुसार, भास्करराव पाटील खतगावकर यांना त्यांच्या स्नुषा मीनल यांच्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. काँग्रेसने ही उमेदवारी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे त्यांनी अशोक चव्हाण यांना धक्का देत काँग्रेसमध्ये येणे पसंत केले. भास्करराव पाटील हे 3 वेळा खासदार व 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांचा नांदेड काँग्रेसवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेशाचा काँग्रेसला मोठा लाभ होईल असा दावा केला जात आहे.

अशोक चव्हाण स्वतःच अडचणीत -पटोले

नाना पटोले यांनी या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. राज्यात लवकरच महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. नांदेडमध्ये कुणाची किती ताकद होती हे स्पष्ट झाले. आता खतगावकर यांच्या प्रवेशाने काँग्रेसला आणखी बळ मिळेल. नांदेड येथील अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचा एक मोठा सोहळा पार पडेल. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात हा सोहळा होईल. त्यानंतर तेथूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले जाईल.

अशोक चव्हाण स्वत:च असुरक्षित आहेत. ते सध्या जिकडे आहेत, त्यांनी तिकडेच रहावे. भास्करराव खतगावकर यांनी नांदेडमध्ये तळागाळापासून काम केले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

अनेक नेत्यांनी सोडली भाजपची साथ…

उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपची साथ सोडली आहे. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आता भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या सूनबाई तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीनल पाटील खतगावकर व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नांदेड येथील आणखी काही नेते निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे.

मीनल खतगावकारांनी घेतली होती अमित शहांची भेट…

लोकसभा निवडणुकीपूर्वी मीनल पाटील खतगावकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे नांदेड लोकसभेची उमेदवारी मागितली होती. पण भाजपने त्यांच्याऐवजी आपले विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच पसंती दिली होती. यामुळे खतगावकर यांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे त्यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात हातात घेतला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी पराभव केला होता. पण चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वीच प्रदिर्घ आजाराने निधन झाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page