कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय, मंत्री अदिती तटकरे यांचा यशस्वी पाठपुरावा
७ नोव्हेंबर/मुंबई: राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयानुसार रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली असून, यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.
धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत दिनांक २७ सप्टेंबर रोजी यासंदर्भात बैठक पार पडली होती, या बैठकीत सुपारी संशोधन केंद्र दिवेआगार येथील ५ एकर जागेत उभारण्याबाबत निर्णय कृषीविभागाने घेतला होता.
रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळावी यादृष्टीने सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे हे आग्रही होते.
या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच अधिक दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवे आगार व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.