मुंबईत गणेशोत्सवचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात निनावी भक्ताकडून लाखो रुपयांचा सोने आणि हिरेजडीत मुकुट दान करण्यात आलाय. बाप्पाच्या चरणी याआधीदेखील अशाप्रकारे निनावी दान काही भक्तांकडून करण्यात आलंय.
मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मुंबईत तर खूप प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण दिसतंय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळतेय. फुलांच्या मार्केटमध्ये गर्दी आहे. सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविक जात आहेत. तसेच मुंबईच्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांची दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे सिद्धिविनायक मंदिरात एक अनोखी गोष्ट बघायला मिळाली आहे.
मुंबईच्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक बाप्पाच्या दरबारी मनोकामना पूर्ण झाल्याने एका निनावी भक्ताकडून पाऊण किलोचा हिरेजडीत सोन्याचा मुकुट दान करण्यात आलाय. लाखोंच्या घरात या हिरेजडित सोन्याच्या मुकुटाची किंमत असल्याचं बोललं जातंय. याचं व्हॅल्युएशन अद्याप करण्यात आलेलं नाहीय. बाप्पाच्या डोक्यावरती हा मुकुट ठेवण्यात आलेला आहे, ज्याला पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.
सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी
सिद्धीविनायक मंदिरात गणेशोत्सवा दरम्यान भक्तांची मोठी रांग लागते. यावर्षीही भक्तांची मोठी रांग लागलेली आहे. देवाच्या दानात विलक्षण वाढ झालीय. सोने, चांदीच्या दागिण्यांनी बाप्पाची दानपेटी भरून वाहतेय. गर्दीचं नियोजन करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
सिद्धिविनाायक बाप्पाच्या मंदिराला खूप महत्त्व
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मुंबईत फिरायला येणारी प्रत्येक व्यक्ती या मंदिराला दर्शन घेण्यासाठी येते. केंद्रीय स्तरापासून ते स्थानिक राजकारणातील बडे नेते इथे बाप्पाच्या आशीर्वादासाठी येतात. याशिवाय राज्यभरातील भक्त सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. त्यामुळे या मंदिराला खूप महत्त्व आहे.
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये गर्दी
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सध्या प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. सध्या गणेशोत्सवनिमित्ताने सुट्टीचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तसेच मुंबईतील विविध गणपती मंडळांना भेटी देत आहेत. बाप्पाचं दर्शन घेत आहेत. यामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तुफान गर्दी होताना दिसत आहे.