“मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्याप्रती रुची वाढेल व त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल”, असे प्रतिपादन महामहीम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ या मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
“जन्मापासून लहान मुलांना इंग्रजी भाषा शिकविण्याचा पालकांचा अट्टहास योग्य नाही. लहान मुलांना सुरुवातीला मातृभाषा आत्मसात करू द्यावी व त्यानंतर त्यांना इंग्रजीच नाही तर जर्मन, फ़्रेंच व इतर कुठलीही भाषा शिकणे शिकणे अवघड जाणार नाही. मराठी भाषा ही शिकण्यास सोपी असल्याचे आपण अनुभवातून सांगू शकतो असे नमूद करून आपण सार्वजनिक कार्यक्रमात आणि विशेषतः राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये दीक्षांत समारोह व इतर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मराठीतून करण्याबाबत आग्रही राहिलो,’’ असे राज्यपालांनी सांगितले.
“भाषांचा एक कालखंड असतो. एकेकाळी प्रचलित असलेली ग्रीक भाषा आज नाममात्र शिल्लक आहे. परंतु भारतीय भाषा प्रवाही आहेत असे सांगून उज्वल भवितव्यासाठी वर्तमान काळात जगताना आपला वैभवशाली भूतकाळ स्मरणात ठेवणे गरजेचे ठरते आणि यासाठी भाषा जीवंत असणे महत्वाचे ठरते” असे त्यांनी सांगितले.