चिपळूण : कोकणातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान दुपारी 12 ते 5 पर्यंत वाहतुकीस राहणार बंद राहणार आहे. घाटातील अवघड काम करण्यासाठी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्याच्या आधी परशुराम घाटाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या काळात परशुराम घाट बंद असला तरी या मार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी आंबडस मार्गे वळवण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागमोडी वळणाचा चिपळूण नजीकचा परशुराम घाट हा महामार्गावरील जवळपास तीन किलोमीटरचा घाट आहे. गेल्या वर्षी पावसामुळे याच घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अक्षरश: डोकेदुखी बनली होती. याचं एकमेव कारण म्हणजे संथ गतीने सुरु असलेले घाटातील चौपदरीकरणाचे काम. कामावेळी अर्धवट केलेल्या डोंगर कटाईमुळे पावसाळ्यात या डोंगराची माती, दरड महामार्गावर येवून वाहतूक ठप्प व्हायची. गेल्या पावसात तर आठ वेळा दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. तर घाट दोन महिने बंद करण्यात आला होता.
पाऊस थांबल्यानंतर या घाटाच्या कामासंदर्भात विशेष लक्ष देण्यात आले आहे. घाटातील रुंदीकरणाच्या कामालाही गती देत दिवस-रात्र काम सुरु ठेवण्यात आले आहे. घाटाच्या मध्यापर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता अतिशय धोकादायक असलेला दरडीच्या डेंजर झोनमध्ये संरक्षण भिंतीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे घाटातील चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी बहुतांशी काम मार्गी लावण्याची शक्यता आहे.
महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाटा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे 22 मीटर उंचीचा डोंगर उतार आणि दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढेगाव. त्यामुळे येथे डोंगर खुदाईसह अन्य कामे करणे अवघड असतानाही एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले. वर्षभरापूर्वी याच घाटात डोंगर खुदाई करतात पोकलेन दरडीखाली सापडून चालकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला होता.
या घटनेनंतर वेळोवेळी खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले. सर्वप्रथम पायतालगत असलेल्या गावात सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली. पहिल्या टप्प्यातील 450 मीटर लांबीची आणि दुसऱ्या सुमारे दहा मीटर उंचीच्या संरक्षित भिंतीचे काम पूर्ण केले. या भिंतीमुळे डोंगराच्या खालील रस्ता सुरक्षित झाला. मात्र आता घाटात अतिशय धोकादायक टप्पा मानला जाणाऱ्या दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारली जात आहे.
जाहिरात