मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला शुक्रवारीही बसला. रुग्णालयामध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अनेक कामांचा भार वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, निवासी डॉक्टरांवर पडला. मात्र वैद्यकीय सेवा देताना इतर कामांचाही भार पेलावा लागत असल्याने डॉक्टरांची डोकेदुखी वाढत आहे.
रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. कर्मचारी नसल्याने महत्त्वाच्या वैद्यकीय सेवांवर येणारा ताण, वैद्यकीय मदत मिळण्यामध्ये होणारा विलंब लक्षात घेत अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारला. जे. जे. , कामा, सेंट जॉर्जेस या रुग्णालयांमध्ये नव्याने वैद्यकीय उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. ‘ज्या रुग्णांची आर्थिक क्षमता नसते, त्यांच्यासाठी सार्वजनिक रुग्णालयांचा आधार असतो. खासगी वैद्यकीय सेवा सगळ्यांना कशी परवडणार’, असा प्रश्न जळगावहून वैद्यकीय उपचारासाठी पत्नीला मुंबईत घेऊन आलेल्या आनंद पवार यांनी उपस्थित केला. चौथ्या दिवशीही संप कायम राहिल्याने मुंबईतील जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस, जी. टी आणि कामा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण सेवेतील रुग्णसंख्येत घट झाली असून, शस्त्रक्रियाही बाधित झाल्या आहेत.
राज्य सरकारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा पहिल्या दिवसापासून रुग्णालयीन सेवेवर परिणाम दिसू लागला असला तरी चौथ्या दिवशी हा परिणाम अधिक तीव्र दिसत आहे. रुग्णालयातील अनेक सेवा खोळंबल्याने रुग्णांनीच रुग्णालयाकडे पाठ फिरवली असल्याचे बाह्य रुग्ण विभागातील रुग्णसंख्येवरून दिसून येते. जे. जे. रुग्णालयामध्ये दररोज बाह्यरुग्ण विभागात चार हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र गुरुवारी अवघे १८०० रुग्णच उपचारासाठी आले. तर ६०० रुग्णांना रुग्णालायमध्ये दाखल करण्यात आले. जी. टी. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे एक हजारच्या आसपास रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असताना गुरुवारी ४५० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आले. तर अपघात विभागामध्ये ७६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच सेंट जॉर्जेस रुग्णालयातही गुरुवारी १२७ रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आले तर अपघात विभागामध्ये ७४ रुग्णांवर उपचार करण्यात आले.