
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथे मासेमारीसाठी गेलेल्या प्रकाश अर्जुन गेल्ये (वय ५४) या प्रौढाचा नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे काटवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, प्रकाश गेल्ये यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गेल्ये हे नेहमीप्रमाणे गावातील नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याजवळ मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते पाण्याच्या खोल प्रवाहात ओढले गेले. स्वतःला सावरून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बंधाऱ्याकडे धाव घेतली आणि शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, नदीपात्र अथवा बंधाऱ्यांच्या परिसरात मासेमारीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या पातळीचा आणि खोलीचा अंदाज घेऊन स्वतःच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी बाळगावी, असे आवाहन ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*