साहेब.. लवकर या, इथे सांगाडा पडलाय..; पोलिसांचा फोन खणाणला गोंधळ उडाला पण वेगळंच सत्य समोर; पुण्यातील धक्कादायक घटना….

Spread the love

पुणे- येरवड्यातील नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकात गुरुवारी दुपारी रस्त्याच्या कडेला मानवी सांगाडा दिसल्याची माहिती समोर येताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही काळ परिसरात गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मात्र, तपासाअंती तो सांगाडा खरा नसून, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेला कृत्रिम सांगाडा असल्याचे उघड झाले. त्यामुळे परिसरातील भीतीचे वातावरण दूर झाले आणि नागरिकांसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शहरातील पोलिसांना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एक आगळावेगळा अनुभव आला. येरवड्यातील नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात मानवी सांगाडा पडल्याची माहिती मिळाली. हा परिसर अत्यंत वर्दळीचा आणि व्यापारी हालचालींचा भाग असल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि लोकांची वर्दळ होती. पोलिसांच्या गाड्या व कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच पादचारी व वाहनचालकांनी गर्दी केली. ‘माणसाचा सांगाडा सापडला,’ अशी चर्चा पसरल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. पोलिसांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता डोके, छाती व कमरेच्या सांगाड्याचा भाग पडलेला आढळला.

सुरुवातीला तो खरा सांगाडा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, बारकाईने तपासल्यावर तो प्रयोगशाळेत वापरण्यासाठी आर्टिफिशियल सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. तो प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करून तारेने जोडलेला होता. पोलिसांनी सांगाड्याची तपासणी करून त्यात कोणताही गुन्हेगारी प्रकार किंवा संशयास्पद बाब आढळून आली नसल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला असून, माहिती नोंदवून पुढील कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके म्हणाले, ‘सांगाड्याची तपासणी केली असता तो कृत्रिम असल्याचे समजले. कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा संशयास्पद बाब या प्रकरणी आढळलेली नाही. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि भीती न बाळगता सत्य माहितीची खात्री करूनच प्रतिक्रिया द्यावी.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page