भाजपच्या मदतीसाठी कल्याण-डोंबिवलीत लाडक्या बहिणींना उचललं मोठं पाऊल, मविआला मोठा झटका….

Spread the love

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां पार्श्वभूमीवर भाजपने महिला बचत गटांना पक्षात सामील करून घेण्याची एक वेगळी रणनीती आखली आहे. कल्याण पूर्वेतील एका मोठ्या पक्षप्रवेश कार्यक्रमात याची झलक दिसली. यातून महिला सक्षमीकरण आणि पक्ष बळकटीकरण हे दोन्ही उद्दिष्ट साध्य करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे….

कल्याण /ठाणे/ प्रतिनिधी- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आला आहे. एकीकडे राजकीय पक्ष एकमेकांच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात ओढण्यात व्यस्त असताना, भाजपने मात्र एक वेगळी रणनीती अवलंबली आहे. भाजपने आता थेट महिला बचत गटांना पक्षात सामील करून घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महिला सक्षमीकरण आणि पक्षविस्तार एकाच वेळी साधण्याचा हा भाजपचा एक नवा मानला जात आहे.

कल्याण पूर्वेतील अडवली ढोकळी परिसरात नुकताच एक महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात आई एकविरा बचत गटाच्या अध्यक्षा सोनी शिरसागर यांनी त्यांच्या बचत गटातील शेकडो महिलांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डोंबिवली येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपची रणनीती…

यावेळी सोनी शिरसागर यांनी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीमुळे प्रेरित होऊन घेतल्याचे स्पष्ट केले. “आमचा पुढील हेतू कल्याण ग्रामीण परिसरात भाजपला अधिक बळकट करण्याचा आणि महिला सक्षमीकरणाचा आहे, असे सोनी शिरसागर म्हणाले. त्यांच्या या भूमिकेतून बचत गटांमधील महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्याची आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची भाजपची रणनीती दिसून येते.

सध्या अनेक पक्षांमधून कार्यकर्ते भाजपमध्ये येत असले तरी, भाजपने बचत गटांना पक्षात घेऊन एक अत्यंत मोठी राजकीय खेळी खेळली आहे. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी ही पक्षप्रवेशाची लाट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे आल्याचे म्हटले आहे. लवकरच इतर पक्षांमधील मोठे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजपमध्ये सामील होतील. यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण होईल,” असा निर्धार नंदू परब यांनी व्यक्त केला.

भाजपकडून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न…

महिला बचत गटांना पक्षात घेऊन भाजप केवळ आपला पक्षविस्तार करत नाही, तर स्थानिक पातळीवर महिलांशी थेट संपर्क साधून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये असलेली संघटनशक्ती आणि त्यांचा स्थानिक पातळीवरील प्रभाव खूप मोठा असतो. त्यामुळे, भाजपची ही खेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपने महिला सक्षमीकरण आणि पक्ष बळकटीकरण या दुहेरी उद्दिष्टांनी ही नवी राजकीय खेळी सुरू केली आहे. यामुळे भाजपला केवळ मतांचे नव्हे, तर तळागाळातील महिलांच्या संघटनांची आणि त्यांच्या प्रभावाची मोठी ताकद मिळू शकते. ही रणनीती महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page