
*चिपळूण-* वयोमानानुसार येणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी गंभीर रूप धारण करू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ६८ वर्षीय महिलेवर भ. क. ल. वालावलकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डेरवण येथे करण्यात आलेली यशस्वी शस्त्रक्रिया. काही दिवसांपूर्वी त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी अचानकपणे गेलेली होती. डोळा हलत नव्हता, डाव्या कपाळाकडे डोकेदुखी जाणवत होती. ही स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच तातडीने उपचार सुरू करण्यात आले आणि या प्रयत्नांना यशही मिळाले.
रुग्णाची सुरुवातीची तपासणी आपत्कालीन विभागातील निवासी डॉक्टरांनी केली. प्रकरण गंभीर असल्यामुळे डॉ. सुवर्णा पाटील (एम.डी. मेडिसिन व वैद्यकीय संचालिका) यांना माहिती देण्यात आली. त्यांनी रुग्णाला ईएनटी विभागाकडे पाठवले. रुग्ण मधुमेहाने त्रस्त असल्यामुळे तिची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होती. डॉ. राजीव केणी, डॉ. प्रतीक शहाणे आणि डॉ. सिजा यांच्या टीमने तातडीने तपासणी केली. नाकाचा एंडोस्कोपी केला गेला पण ठोस निदान न झाल्याने रुग्णाला नेत्रतज्ज्ञ डॉ. सागर पाटील यांच्याकडे पाठवण्यात आले. तपासणीत त्यांच्या डाव्या डोळ्याची संपूर्ण दृष्टी गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एमआरआय आणि कॉन्ट्रास्ट सीटी स्कॅन करण्यात आले.
स्कॅनिंगमध्ये डाव्या स्पिनोइड सायनस मध्ये वाढलेला गाठेसदृश भाग दिसून आला जो ऑप्टिक नर्व्हवर दबाव टाकत होता. यामुळे ऑर्बिटल सेल्युलायटिसची सुरुवात झाली होती आणि डोळ्याचा हालचाल करणारा medial rectus स्नायू प्रभावित झाला होता. परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने तातडीने एंडोस्कोपिक सायनस सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. राजीव केणी यांच्या नेतृत्वाखाली ऑप्टिक नर्व्ह आणि ऑर्बिटचे डिकम्प्रेशन करण्यात आले. डॉ. लीना ठाकूर आणि डॉ. अभिजीत रोकडे यांच्या नेतृत्वाखाली अॅनेस्थेशिया टीमने अत्यंत कुशलतेने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली. संपूर्ण उपचार प्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा झाली. केवळ तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दहा दिवसांनंतरच्या फॉलोअपमध्ये रुग्णे आनंदाने सांगितले की, “डाव्या डोळ्यात आता प्रकाश जाणवतो आहे.” डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात दृष्टी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. १५ दिवसांनी त्या पुन्हा ओपीडीमध्ये आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. “आता मला अस्पष्ट का होईना, पण दिसतंय! डोळ्यांची हालचालसुद्धा पूर्ववत झाली आहे. मी तर सगळी आशा सोडली होती. पण डॉक्टरांनी वेळेवर आणि मनापासून उपचार केल्यामुळे मला दृष्टी परत मिळाली,” असे त्या आनंदाने सांगत होत्या. ही यशोगाथा म्हणजे वेळेवर निदान, कुशल डॉक्टरांचे प्रयत्न, आणि आरोग्य योजनेचा लाभ यांचे प्रत्यक्ष उदाहरण ठरते. वालावलकर रुग्णालय व त्यातील डॉक्टरांचे कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.