
लहानपणापासून IAS बनण्याचे स्वप्न पाहिले; आजही क्रिकेटची आवड कायम
मुंबई : राजस्थानातील सवाई माधोपूर येथून आपल्या आयुष्यातील प्रवास सुरू केलेले आणि अत्यंत साधेपणाने प्रशासनात उज्वल कामगिरी बजावणारे राजेश कुमार मीणा यांनी सोमवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. आपल्या जबाबदाऱ्या आणि निष्ठावान सेवेमुळे राज्य प्रशासनात आदर्श म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मीणा यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
बालपणातच स्वप्न उराशी
राजेश मीणा यांनी लहानपणापासूनच मोठं स्वप्न पाहिलं होतं. सातवी-आठवीत असताना ते आपल्या वहीत ‘राजेश कुमार आयएएस’ असे लिहित असत, हे त्यांच्या बालमित्रांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. त्या स्वप्नाचा पाठपुरावा करत, त्यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशातील सर्वोच्च नागरी सेवेत प्रवेश मिळवला.

कोणी नकोसे समजत असे तेथेही सेवा केली
गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रात सेवा बजावत असलेल्या मीणा यांची अनेकदा अशा विभागांमध्ये नियुक्ती झाली, जिथे जाण्याचे कोणीही धाडस करत नव्हते. परंतु, त्यांनी त्या कठीण परिस्थितीही संधी मानत, प्रशासन, लोकसेवा आणि पारदर्शक कारभाराचा आदर्श प्रस्थापित केला. त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागातही प्रभावी कामगिरी केली आहे.
साधेपणा आणि आपुलकी आजही जपलेली
मुख्य सचिव या उच्चपदावर असतानाही राजेश मीणा हे आजही गावात गेले की बालमित्रांसोबत क्रिकेट खेळतात, त्यांच्या कुटुंबातील सदस्य व मित्र सांगतात. त्यांचे नम्र व मितभाषी स्वभाव, कामातील काटेकोरपणा आणि सर्वसामान्यांसाठी नेहमी खुले असलेले दालन यामुळेच ते ‘जनतेचा अधिकारी’ म्हणून ओळखले जातात.
कुटुंबीयांचा अभिमान
दिव्य मराठीने सवाई माधोपूरमध्ये त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता, त्यांचे नातेवाईक अत्यंत आनंदित होते. “लहानपणापासून अभ्यासू आणि मन लावून काम करणारा मुलगा आज महाराष्ट्राच्या शिखरावर पोहोचला, याचा अभिमान वाटतो,” असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.
राजेश मीणा यांच्या मुख्य सचिवपदाच्या कारकिर्दीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यांच्या प्रशासनिक अनुभवाचा फायदा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.