
रत्नागिरी: शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ रत्नदुर्ग किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉट येथे रविवारी समुद्रात पडलेली एक अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता असून, घटनेनंतर 48 तास उलटूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. नाशिकमधून बेपत्ता झालेली एक तरुणी रविवारी रत्नागिरीत आली होती. तिने रत्नदुर्ग किल्ल्यावरून शहरातील एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या मित्राला फोन केला होता. त्यानंतर ती तरुणी गायब आहे. त्यामुळे समुद्रात पडलेली तरुणी नाशिकमधील असण्याची शक्यता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे 23 ते 25 वयोगटातील एक तरुणी पाणभुयार स्पॉटजवळ सेल्फी घेण्यात गुंग होती. या दरम्यान तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूला ठेवले आणि रेलिंगच्या पुढे गेली. अचानक तोल जाऊन ती थेट खोल समुद्रात पडली. आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरड केली, मात्र ती काही क्षणांतच खवळलेल्या समुद्रात गायब झाली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, रत्नदुर्ग माउंटेनियर्स आणि चिपळूणहून आलेले एनडीआरएफचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिशरीज विभागाच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, खवळलेला समुद्र आणि जोरदार वाऱ्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. शहरातील सर्व शासकीय व खासगी वसतीगृहे, शाळा व महाविद्यालयांत पोलिसांनी तपास केला, मात्र कोणतीही बेपत्ता तरुणी असल्याची नोंद सापडलेली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स तसेच पर्यटकांकडून वर्णन मिळवण्याचा प्रयत्न केला, तरीही कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही.
उशिराने प्राप्त माहितीनुसार, दि. २८ जून रोजी बँकेत काम करणारी एक तरुणी नाशिकमधून बेपत्ता झाली होती. त्याबाबत तिच्या नातेवाईकांनी नाशिकमधील पोलीस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तर त्याच तरुणीने रविवारी १०. ३० वाजता रत्नदुर्ग किल्ल्यावरून तिथे फिरायला गेलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या रत्नागिरीतील मित्राला फोन केला होता. नंतर ती बेपत्ता झाली आहे. याच दरम्यान एक तरुणी समुद्रात पडल्यामुळे हि तरुणी नाशिकची असल्याची शक्यता वाढली आहे.