
दीपक भोसले/संगमेश्वर– तालुक्यात भात लावणीच्या कामांना जोरदार प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पावसाची वेळेवर व समाधानकारक हजेरी आणि उत्तम रोपे तयार झाल्याने यावर्षी शेतकरी विशेष आनंदित दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांतील अनिश्चित पावसामुळे अनेक अडचणींना सामोरे गेलेल्या शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा खरिप हंगाम आशादायक ठरत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी वेळेवर शेतीची कामे पूर्ण करत आहेत. भाताची रोपेही चांगल्या प्रतीची आणि पुरेशी झाल्यामुळे लावणीची कामे जोरात सुरू आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी पहाटेपासून शेतात उतरून लावणी करत असून, शेतात काम करणाऱ्या महिलांचा विशेष सहभाग आहे. महिलांच्या गाण्यांनी आणि गडगडाटी वातावरणात चालणाऱ्या या लावणीने खेड्यांमध्ये खरीप हंगामाचे स्वर गाजत आहेत.
स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “यंदा लावणीची गती समाधानकारक असून पाणी आणि रोपांचे व्यवस्थापन चांगले होत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत आणि बी-बियाणे उपलब्ध झाल्यामुळे यंदाचा हंगाम चांगला जाण्याची शक्यता आहे.”
यावर्षी वेळेवर आणि सुसंघटित पद्धतीने शेतीची कामे सुरू असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे अर्थिक स्थैर्यही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.