
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवाळकोट रोडवरील हायलाईफ बिल्डिंगमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास या बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या घराच्या किचनमध्ये अचानक एक बंदुकीची गोळी खिडकीची काच फोडून आत शिरली. या घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने किचनच्या खिडकीवर छिद्र पडले असून आत छऱ्याची गोळी सापडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र अशा प्रकारचा दिवसाढवळ्या नागरी वस्तीतील गोळीबार अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
यासंदर्भात तक्रारदार साजिद सरगुरो यांनी सांगितले की, “सकाळी पावणे अकराच्या सुमारास आमच्या किचनच्या खिडकीतून अचानक गोळी आली आणि काच फुटली. कोणीतरी आमच्या बिल्डिंगच्या मागच्या शेतातून शिकार करत असावा. आम्ही आवाज दिल्यावर संबंधित व्यक्ती पळून गेला.”
तांबे यांच्या बिल्डिंगच्या मागे सध्या भात लावणीचे काम सुरू आहे. याच भागातून ही गोळी आल्याचा अंदाज आहे. साजिद सरगुरो म्हणाले, “गोळी जर काचेला लागली नसती आणि थेट घरात कोणाला लागली असती, तर मोठा अपघात घडला असता.”
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोळी शिकारीच्या उद्देशाने झाडण्यात आली असावी. मात्र अशा प्रकारचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.