भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष:चंद्रशेखर बावनकुळेंच्या जागी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती होणार;  30 जूनला अर्ज 1 जुलैला घोषणा…

Spread the love

*मुंबई-* भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. त्यासाठी रवींद्र चव्हाण हे 30 जून रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यानंतर एक जुलै रोजी त्यांची नियुक्ती जाहीर केली जाणार आहे. वरळी डोम येथे एक जुलै रोजी सकाळी 11 वाजता यासंबंधीची अधिकृत घोषणा होणार असून यावेळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवडीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी दोन केंद्रीय मंत्री आणि एका माजी केंद्रीय मंत्र्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राची जबाबदारी ही मंत्री किरेन रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार आता निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.

अधिकृत रित्या रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा…

रवींद्र चव्हाण यांचीच नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्षपदी होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. भाजपच्या वतीने त्या दृष्टिकोनातून सर्व पावले देखील उचलण्यात येत होती. रवींद्र चव्हाण यांच्याच नेतृत्वातच अनेक पक्षप्रवेश राज्यात होत आहेत. मात्र आता अधिकृत रित्या रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीची घोषणा एक जुलै रोजी होणार आहे.

*महाराष्ट्रासाठी किरेन रिजिजू यांची नियुक्ती*

भाजपचे राष्ट्रीय निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. के लक्ष्मण यांनी महाराष्ट्रासह उत्तराखंड व पश्चिम बंगाल या 3 राज्याच्या प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्तराखंड व पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांचे निवडणूक अधिकारी म्हणून अनुक्रमे केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा व संसद सदस्य रवीशंकर प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बावनकुळे 2022 पासून भाजप प्रदेशाध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला. ओबीसी चेहरा असणाऱ्या बावनकुळेंच्या नेतृत्वात पक्षाने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले. बावनकुळे यांनी भाजपची स्थानिक पातळीवरील रचना मजबूत केली. 1.5 कोटी नवीन प्राथमिक सदस्य व 5 लाख सक्रिय कार्यकर्ते जोडण्यात यश मिळवले. बूथ स्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका आणि नियुक्त्यांचे नियोजन केले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या असल्या तरी, बावनकुळेंनी त्यातून धडा घेऊन विधानसभा निवडणुकीत बूथस्तरीय व्यवस्थापन करून भाजपला यश मिळवून दिले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page