
मुंबई :- २०२५ चे पहिले ६ महिने संपत आले आहेत आणि आता काही दिवसांतच जुलै महिना सुरू होईल. जुलै महिन्यात असे अनेक बदल होणार आहेत, तुमच्या जे खिशावर खूप मोठा परिणाम करू शकतात. यामध्ये रेल्वे तिकिटाच्या भाड्यापासून ते एटीएममधून पैसे काढण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.
१ जुलैपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे तिकिटं महाग होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैपासून नॉन-एसी कोचचं भाडे प्रति किलोमीटर १ पैशाने आणि एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर २ पैशानं वाढणार आहे.
तिकीट एजन्ट्सना आळा घालण्यासाठी रेल्वेनं तिकीट बुकिंगचे नियमही बदलले आहेत. १ जुलै २०२५ पासून, तत्काळ रेल्वे तिकिटं बुक करणाऱ्या युजर्सना ओटीपी देखील द्यावा लागेल, जो त्यांच्या आयआरसीटीसी खात्यात नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. १५ जुलैपासून ओटीपी आधारित तत्काळ तिकीट बुकिंग अनिवार्य होणार आहे .
तात्काळ तिकिटं बुक करताना, एजंटना १ जुलैपूर्वी अर्धा तास आधी तिकिटं बुक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामुळे अधिकाधिक लोकांना सिस्टममध्ये तात्काळ ट्रेन तिकिटं मिळण्यास मदत होईल.
१ जुलैपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. सीबीडीटीनं म्हटल्यानुसार १ जुलै २०२५ पासून पॅन कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलंय. त्याच वेळी, ज्यांच्याकडे आधीच ही दोन्ही कागदपत्रं आहेत त्यांना ती लिंक करावी लागतील. यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे.
१ जुलैपासून आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे. बँकेच्या ग्राहकांना फक्त ३ मोफत ट्रान्झॅक्शन्स मिळतील. त्यानंतर, आर्थिक व्यवहारांवर २३ रुपये आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन्सवर ८.५ रुपये शुल्क आकारलं जाईल. महानगराबाहेरील शहरांमध्ये, ही मर्यादा दरमहा ५ ट्रान्झॅक्शन्स इतकी असेल.
देशातील इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी आणि जेट इंधनाच्या किमतींमध्ये बदल करत असतात. अशा परिस्थितीत, १ जुलै रोजी एलपीजीच्या किमतीत काही कपात किंवा वाढ होतं की नाही हे पहावं लागेल.