
*मुंबई-* राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यात पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षकपदी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर, महेंद्र पंडित यांची स्तंभ 2 मधून स्तंभ 3 मध्ये नमूद पदावर बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, महेंद्र पंडित यांना बृह्न्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तब्बल 81 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून 51 IPS अधिकार्यांना काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशन करुन बदली करण्यात आली आहे.
पुण्यातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे बदली करण्यात आली असून वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची देखील बदली करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या बदली आदेशान्वये पुण्यामध्ये तीन नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची बदली पुण्यातील यशदाचे उपसंचालकपदी करण्यात आली. त्यानंतर, आता 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.