
मुंबई : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि अन्य हवामान संस्थांच्या ताज्या अंदाजानुसार, आज २६ जून रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण व घाटमाथा (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) किनारपट्टीवर जोरदार पावसाचा मारा होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे,पालघर येथे हलक्या ते मध्यम सरी, काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १०० – १५० मिमीपर्यंत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
पुणे व सातारा घाटमाथा परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस वर्तवला आहे. पुण्यात ४० ते १२० मिमी पावसाची शक्यता आहे. तर सांगली,कोल्हापूरमध्ये नद्या-नाल्यांना पुराचा धोका सांगितला आहे. यामुळे स्थानिक प्रशासन देखील सतर्क आहे.
मराठवाडा (बीड, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर )बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी, काही भागांत रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव व लातूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
*विदर्भ (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया)*
हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. नागपूर,वर्धा,चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक व धुळे येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जळगावमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी पडतील.
*कोणते जिल्हे धोक्याच्या झोनमध्ये ?*
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यभर पावसाचे प्रमाण वाढले असून, शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
*ऑरेंज अलर्ट :*
*मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग*
*यलो अलर्ट :*
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्हे
*शेतकऱ्यांसाठी सल्ला…*
पावसामुळे पिकांच्या नुकसानाची शक्यता असल्याने शेतीत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या. नाल्यांची सफाई करून पाण्याचा मुक्त निचरा सुनिश्चित करा. शेती कामकाज शक्य असल्यास पुढे ढकला, तसेच हवामान अपडेटवर लक्ष ठेवा.