मार्लेश्वर तीर्थक्षेत्री वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके, योग प्रात्यक्षिके…

Spread the love

देवरुख पोलीस ठाणे, तालुक्यातील पोलीस पाटील, श्री मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट, राजू काकडे हेल्प अँकॅडमी, आपलं देवरूख सुंदर देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम

वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज- देवरूख पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर

देवरूख- देवरुख पोलीस ठाणे, तालुक्यातील पोलीस पाटील, श्री मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट, राजू काकडे हेल्प अँकॅडमी, आपलं देवरूख सुंदर देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने मार्लेश्वर तीर्थक्षेत्री आज शनिवारी वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके, योग प्रात्यक्षिके करण्यात आली. या स्तुत्य उपक्रमात भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरस्कर यांनी वृक्ष लागवड करणे व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

तसेच पर्यावरणाचा र्‍हास होत असून वातावरणात चुकीचे बदल दिसायला लागले आहेत. यावर वृक्ष लागवड हाच उपाय आहे असे सांगत महेश तोरस्कर यांनी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, पर्यटकांनी, भाविकांनी स्वच्छता राखून परिसराचे पावित्र्य जपावे असे आवाहनही त्यांनी केले. शनिवारी राबवलेल्या या उपक्रमात देवरूख पोलीसांसमवेत राजू काकडे हेल्प ॲकॅडमी, आरोग्य विभाग, महसुल विभाग, देवरुख नगरपंचायत अग्निशमन यंत्रणा, आपतकालीन विभाग,  देवरुख, आपलं देवरुख-सुंदर देवरुख, देवरुख रेनट्री, बार्टी पुणे विभाग, पोलीस पाटील संघटना, मार्लेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ, मारळ ग्रामपंचायत सहभागी झाले होते.

मार्लेश्वर कमानी परिसरात कृषीतज्ञ हेमंत तांबे व पोलीस निरीक्षक तोरस्कर यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला. यासाठी आपल्या नर्सरीतील वृक्ष तांबे यांनी उपलब्ध करुन दिले. देवरुख पोलीस उपनिरीक्षक महेश तोरस्कर, पोलीस हे. काँ. सागर मुरुडकर यांनी योग प्रात्यक्षिके दाखवली. राजू काकडे हेल्प ॲकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी आपतकालीनची प्रात्यक्षिके सादर केली. युयुत्सु आर्ते यांनी संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला. योगाचे महत्व विशद केले. मार्लेश्वर पायथ्यापासून मंदिरापर्यंत स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी व्यापारी वर्गाने चांगले सहकार्य केले. मारळ ग्रामपंचायतीने या मोहिमेत सहभाग नोंदवला. देवस्थानतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नारायण गुरव, विजय लिंगायत, रुपेश सावंत, रेनट्रीचे किशोर राक्षे, बार्टीचे सुशील कांबळे तसेच सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र येथे लावण्यात आलेल्या वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी देवस्थान कमिटीने घेतली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page