भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही जे.एम.म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चरवर ईडीची धाड , पनवेल येथील वनजमीन घोटाळाप्रकरणी कारवाई निवासस्थानी व कार्यालयांवर छापेमारी…

Spread the love


पनवेल | पनवेल तालुक्यातील वहाळ गावात झालेल्या शासकीय वनजमीन बळकावण्याच्या प्रकरणात ईडी मुंबई झोन-२ मार्फत जे.एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक जे.एम. म्हात्रे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर मंगळवारी (१७ जून) सकाळपासून छापेमारी सुरू आहे. ही कारवाई उरण (अलिबाग विभाग) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुषंगाने याप्रकरणी रिपोर्ट दाखल करून तपास सुरु केला. वनविभागाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २००५ मध्ये म्हात्रे यांच्याकडून बनावट सातबारा नोंदी करून पनवेल तालुक्यातील वहाळ येथील वनजमीन बेकायदेशीरपणे मिळविण्यात आली. या जमिनीतून १.८६ हेक्टर जमीन म्हात्रे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विक्री केली आणि त्यासाठी त्यांना ४२.४० कोटींचा मोबदला मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच, सय्यद मोहम्मद अब्दुल हमीद कादरी यांनी गट क्रमांक ४२७/१ मधील ०.४२२५ हेक्टर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित केली आणि त्याबदल्यात ९.६९ कोटी रुपये घेतले, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. या घोटाळ्याशी संबंधित “प्रोसिड्स ऑफ क्राईम” म्हणजेच आर्थिक गैरव्यवहारातून मिळालेली मालमत्ता शोधण्यासाठी ईडीकडून पनवेलमधील दोन ठिकाणी व मुंबईतील दादर येथील एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर भारतीय दंड संहिता, वन कायदा तसेच प्रतिबंधक आर्थिक व्यवहार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून ईडीने या आर्थिक घोटाळ्यातील साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या ईडीकडून जमिनीचे मूळ दस्तऐवज, आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती, तसेच तत्कालीन व्यवहारांमागील संगणकीय डेटा जप्त केला जात आहे. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, या कारवाईतून राजकीय आणि प्रशासकीय साठेबाजांशी असलेले संबंध उघड होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या पनवेलमधील जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. आरक्षित वनजमिनीचे बेकायदेशीर संपादन करून ती नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) ला विकल्याचा आरोप म्हात्रे यांच्यावर असून, या प्रकरणात तब्बल 50 कोटी रुपयांची शासनाची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, जे. एम. म्हात्रे यांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत प्रितम म्हात्रे यांनीही पक्षप्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही म्हात्रे यांच्यावर ईडीने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नेमके प्रकरण काय?

ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या पनवेलमधील कार्यालयावर छापा टाकून दस्तावेज जप्त केले आहेत. हा गैरव्यवहार 2005 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे वनविभागाच्या जमिनीचा ताबा घेतल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. उरण वनविभागाने याप्रकरणी 2023 मध्ये तक्रार दाखल केली होती, ज्यावर कारवाई करत ईडीने ही धाड टाकली आहे.

हा व्यवहार पनवेल तालुक्यातील मौजे वहाळ गावात करण्यात आला होता. जे. एम. म्हात्रे यांनी या प्रकरणातील 1.86 हेक्टर जमीन NHAI ला विकून 42.4 कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे. तसेच, सहआरोपी सय्यद कादरी यांनी त्याच भूखंडातील 0.44 हेक्टर जमीन विकून 9.69 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश

जे. एम. म्हात्रे हे पनवेल-उरण तालुक्यातील शेकापचे मोठे नेते होते. पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. महाविकास आघाडीमध्ये शेकापची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप जे. एम. म्हात्रे यांनी 29 एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन केला होता. शेकापमध्ये निष्ठेने काम केल्यानंतरही आपल्याला बाजूला सारण्याचे प्रयत्न झाले, असा आरोप त्यांनी केला होता. अखेर जे. एम. म्हात्रे यांनी 10 मे रोजी अनेक स्थानिक नगरसेवक, माजी पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page