दिव्यात ‘खरंच शिक्षणाच्या आयचा घो’,अनधिकृत शाळांचा आकडा ‘अब की बार सौ पार’…

Spread the love

सुशांत पाटील-ठाणे/दिवा- पुणे जस शिक्षणाच माहेरघर म्हटलं जात. दिवा हे अनधिकृत बांधकामांच माहेरघर तसं इथल्या अनधिकृत शाळांचेही माहेरघरच आहे. हे म्हणायला काही हरकत नाही. काही दिवसांपूर्वी शाळांचे  निकाल लागलेत. पालकांची आपल्या मुलाला/मुलीला  चांगल्या शाळेत दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. इथल्या अनधिकृत शाळाही आपल ब्रंडिंग प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. दिव्यात घरोघरी या शाळांचे प्रमोशन पॅम्लेट पडयाला सुरूवात झालीय.


या अनधिकृत शाळांचा आकडा भयानकरीत्या वाढतोच आहे. या शाळांना आणि शाळा चालवणाऱ्यांना शासनाचा धाक आहे की की नाही, हासुद्धा मुख्य प्रश्न आहे. गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा आकडा ६९  होता. आता तो आकडा ८९ झाला. धक्कादायक बाब अशी एकट्या दिव्यात ७२ अनधिकृत शाळा आहेत. या शाळांवर वचक कोण लावणार असा प्रश्न सर्वसामान्य दिवेकर विचारत आहे.


एकीकडे या बेकायदा शाळा बंद करण्यासाठी महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. महापालिका शिक्षण विभागाकडून संचालकांना वारंवार बेकायदा शाळा बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाईदेखील केली आहे. मात्र या संचालकांकडून अधिकाऱ्यांना केराची टोपली दाखवली जातेय.

अनधिकृत शाळांबाबतचा ‘मेस्टा’ या संस्थेचा लढा बरीच वर्षे चालू आहे आणि तो चालूच राहील असे ‘मेस्टा’ चे उत्तम सावंत यांनी सांगितले. या  ज्या अनधिकृत शाळांवर कारवाई हाेणार की फक्त कागदी घोडे नाचवले जाणार हाही एक प्रश्न. या अनधिकृत शाळांच्याविरोधात कारवाई होणार  की हा आकडा वाढतच जाणारा हे येणाराचा काळच ठरवेल.

फक्त लेबल बदललं, बाटली तीच…

गेल्या वर्षी ३ डिसेंबर रोजी दिवा येथील स्मार्ट एज्युकेशन शाळेत दहा वर्षीय शालेय विद्यार्थीनींवर तरुणाने शाळेच्या वर्गात घुसून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. तो नराधम अजून सापडलेला नाही.  सदर घटनेचा शिक्षणाधिकारी ठाणे यांना माहिती मिळताच त्यांनी स्मार्ट एज्युकेशन शाळा व्यवस्थापनाचे चौकशी करून शाळा कायमस्वरूपी बंद करून शाळेला सील करण्यात आले.  शाळा व्यवस्थापनावर मुंब्रा पोलीस चौकी येथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु या स्मार्ट एज्युकेशन शाळेच्या ठिकाणी नव्याने ग्रेटर व्हॅली इंटरनॅशनल प्री- स्कूल नावाने शाळेत विद्यार्थ्यांचे ऍडमिशन चालू आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर ही शाळा सुरू करण्याची हिम्मत कशी होते. यावरून फक्त लेबल बदलल पण बाटली तीच अशी दिव्यात चर्चेचा विषय आहे.

अधिकृत शाळेतच प्रवेश घ्या…

अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळेत समायोजन करणे, तसेच दिवा परिसरात महापालिका स्तरावरून मराठी व इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहेत. अनधिकृत शाळांवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी शाळा अधिकृत आहे किंवा नाही याची चौकशी करावी. तसेच शाळेचा युडायस क्रमांक, प्रथम मान्यता, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह आहे किंवा नाही याची खात्री करूनच प्रवेश घेण्याचे आवाहन शिक्षण अधिकारी कमलाकर म्हेत्रे यांनी केले आहे.

आमचा लढा कायम चालूच राहील…

फोफावलेल्या बेकायदा शाळा कायमस्वरूपी बंद करण्याऐवजी महापालिका अधिकाऱ्यांनी पालकांना उलट ‘धडे’ देण्यास सुरुवात केली आहे. पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे अजब आवाहन महापालिकाशिक्षण विभागाने केले आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या शाळा बंद होणार तरी कधी, असा सवाल विचारला जात आहे. बेकायदा शाळांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी चालढकल करत आहेत. भ्रष्ट अधिकारी या शाळांना पाठीशी घालत असून कारवाई करत नाहीत याची चौकशी झाली पाहिजे.
-नरेश पवार, ठाणे जिल्हाध्यक्ष, मेस्टा संघटना

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page