तनाळीत विहरीत पडलेला बिबट्या सुखरूप बाहेर; वनविभागाचे तत्पर बचाव कार्य…

Spread the love

चिपळूण : चिपळूण वनपरिक्षेत्रातील रामपूर नियतक्षेत्रातील मौजे तनाळी (राधाकृष्णवाडी) येथे आज सकाळी ९ वाजता एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. श्री. सहदेव धोंडू बाईत यांच्या घरामागील विहरीत सौ. सनवी सुरज बाईत यांनी बिबट्या पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्री. राजेश थरवळ यांना याची माहिती दिली. त्यांनी ही माहिती वनविभागाला कळवली.

सदर घटनेची गंभीर दखल घेत चिपळूणचे वनपरिमंडळ अधिकारी श्री. एस. एस. सावंत, फिरते पथक रत्नागिरी-चिपळूणचे अधिकारी श्री. जी. एम. पाटील, वनरक्षक श्री. दत्ताराम सुर्वे, श्री. राहूल गुंठे, श्री. अनंत मंत्रे, तसेच वाहनचालक श्री. नंदकुमार कदम व श्री. संजय अंबोकर हे आधुनिक बचाव सामग्री व पिंजरा घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाच्या या तत्पर बचाव मोहिमेत अवघ्या अर्ध्या तासात विहरीतील मादी बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. कणसे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तो पूर्णतः स्वस्थ असल्याची पुष्टी केली. अंदाजे दोन ते अडीच वर्षांची असलेली ही मादी बिबटी नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

सदर बिबट्याला सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या उपस्थितीत जंगलात मुक्त करण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेत विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. एस. खान यांचे मार्गदर्शन लाभले.

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बिबट्यासारखे वन्यप्राणी मानवी वस्तीत दिसल्यास किंवा संकटात सापडल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. एस. खान यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page