मोठी बातमी! राफेल विमानं आता भारत स्वत: बनवणार, या कंपनीशी करार..

Spread the love

भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे. हैदराबादमध्ये टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि डसॉल्ट एव्हिएशन एकत्रित उत्पादन बनवणार आहेत.





दिल्ली/ प्रतिनिधी- भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे. हैदराबादमध्ये टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि डसॉल्ट एव्हिएशन एकत्रित उत्पादन बनवणार आहेत. २०२७-२८ पासून प्रतिमहिना दोन फ्युझलाज तयार होण्याची शक्यता आहे. या करारानंतर भारताच्या संरक्षण आणि अवकाश उत्पादन क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या एका ऐतिहासिक टप्प्याची नोंद झाली आहे.

फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने भारतातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड सोबत भागीदारी करत राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज भारतात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत फ्रान्सनंतर राफेल फ्युझलाज उत्पादन करणारा पहिला देश ठरणार आहे. या अंतर्गत, टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक उत्पादन केंद्र उभारणार असून त्यामध्ये राफेल विमानाच्या मागील भागाचे लेटरल शेल्स, पूर्ण रिअर सेक्शन, मध्यभागी फ्युझलाज आणि पुढचा भाग तयार केला जाणार आहे. हे केंद्र २०२७-२८ या आर्थिक वर्षात पहिले फ्युझलाज तयार करेल, अशी अपेक्षा आहे. दर महिन्याला दोन संपूर्ण फ्युझलाज तयार करण्याची क्षमता या केंद्राची असेल.

उत्पादन केंद्र केवळ भारतीय हवाई दलासाठीच नव्हे, तर राफेलच्या आंतरराष्ट्रीय मागणीसुद्धा पूर्ण करेल. सध्या भारताकडे ३६ राफेल लढाऊ विमाने आहेत आणि २०३० पर्यंत भारतीय नौदलासाठी २६ राफेल मेरीन जेट्स खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी ६३,००० कोटी रुपयांचा करार भारत आणि फ्रान्समध्ये एप्रिल २०२५ मध्ये झाला आहे. या करारात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि देखभाल व उत्पादन केंद्र उभारण्याच्या बाबतीतही तरतुदी आहेत.

फ्रान्स आणि भारताव्यतिरिक्त राफेल लढाऊ विमाने इजिप्त, कतार, युएई, ग्रीस, इंडोनेशिया, क्रोएशिया आणि सर्बिया या देशांमध्ये वापरली जात आहेत किंवा ऑर्डर दिली आहे. या उत्पादन केंद्रासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स यांच्यात चार वेगवेगळ्या उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून, भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर म्हणाले, “फ्रान्सबाहेर प्रथमच राफेलचे फ्युझलाज भारतात तयार होणार आहेत. टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्ससह आमच्या भागीदारांच्या मदतीने ही आपली पुरवठा साखळी बळकट होईल.”

टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्सचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग यांनी म्हटले की, “राफेल फ्युझलाजचे संपूर्ण उत्पादन भारतात होणे हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे. या भागीदारीतून भारताने तयार केलेल्या मजबूत आणि आधुनिक एरोस्पेस उत्पादन प्रणालीवर विश्वास परावर्तित होतो.”‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना चालना देण्यासाठी या कराराचा मोठा वाटा असून भारताला जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीत एक महत्त्वाचा भागीदार बनवण्याचे उद्दिष्ट या भागीदारीमागे असल्याचे डसॉल्ट आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्सने म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page