

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मनसे नेते राजू पाटील आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पलावा पुलावर अचानक एन्ट्री मारत पुलाची पाहणी केली.
ठाणे /डोंबिवली प्रतिनिधी – राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच डोंबिवली मधील पलावा पुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाच्या विरोधात शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र आल्याचे पहायला मिळाले. वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ निर्णय घेतील, स्थानिक पातळीवर राजकारण कसे करायचे याच आम्हाला चांगलंच ज्ञान आहे, असे मनसे नेते राजू पाटील म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे म्हणाले, आम्ही दोघे कायम स्थानिक प्रश्नांसाठी संपर्कात असतो.
कल्याण शीळ रोडवरील पलावा पुलाचे गेल्या सात वर्षांपासून काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने हे काम सुरू असून वारंवार पुलाच्या कामाची डेडलाईन बदलली जात आहे. कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी नुकतेच पलावा पूल मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शनिवारी पलावा पुलाच्या कामाची पाहणी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मनसे नेते राजू पाटील आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पलावा पुलावर अचानक एन्ट्री मारत पुलाची पाहणी केली. गेली अनेक वर्ष पुलाचे काम रखडल्यामुळे दोन्ही गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या वेळेला शिवसेनेकडून गाजर दाखवत निषेध व्यक्त केला गेला, तर मनसेच्या राजू पाटील यांनी चक्क 500 च्या नोटा दाखवत निषेध केला गेला.
मनसेचे नेते, माजी आमदार पाटील म्हणाले, दीपेश यांनी फोन केल्यामुळे मी आलो. पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. निवडणुकीच्या आधी नक्कीच हा पूर्ण सुरू होईल. मात्र पूल सुरू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या पुलाचे काम रखडले आहे. तिकडचा पूल जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत इकडचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही.

म्हणून नोटा दाखवल्या…
पुलासंदर्भात काही अडचणी असेल तर आमच्या सोबत एकत्र बसून चर्चा करा. आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. या ठिकाणी पैसे दाखवण्याचा एकच कारण आहे की त्यांना पूल बनवताना पैसे कमी पडले तर आमच्याकडे घ्यायला या. यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो. किती पैसा खायचा यासाठी या नोटा दाखवल्या, असे राजू पाटील म्हणाले.

युती, आघाडीचा निर्णय वरिष्ठ घेतील.
राजू पाटील म्हणाले, एकत्र येण्याचे चर्चा वेगळ्या लेव्हलला चालू आहेत. आम्ही स्थानिक लेव्हलला एकत्र आलेलो आहोत. स्थानिक आमदारांनी सांगितलं होतं पूल अनावरण करणार त्यामुळे आम्ही पहायला आलो आहोत. चांगल्या कामाला एकत्र येण्यास काही हरकत नाही. याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. युती आघाडी होईल की नाही ते वरिष्ठ निर्णय घेतील. स्थानिक पातळीवरचे राजकारण कसे करायचे, काय करायचे येवढे ज्ञान आम्हालाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही एकत्र आलोय.’
ठाकरे बंधुंनी एकत्र यावे…
ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. नेते ही इच्छा पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे येत्या काळामध्ये महाराष्ट्रमध्ये चांगले चित्र दिसेल. मंत्री प्रताप सरनाईक हे डोंबिवली मधील आहेत. ते कदाचित मराठी माणसाला हलक्यात घेतात. मराठी माणसाला हलक्यात घेऊ नका. येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मराठी माणूस आपली जागा दाखवेल असा इशारा जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला.