
व्यवसायासाठी कर्ज घेतलं पण व्यवसाय बुडाला, डोक्यावरचं कर्ज वाढत गेलं, अखेर अख्ख्या कुटुंबाने टोकाचा निर्णय घेतला.
उत्तराखंड : कर्जाला कंटाळून एका कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील पंचकुला येथे सोमवारी रात्री घडली. मृतांमध्ये पती-पत्नी, तीन मुले आणि कुटुंबातील वृद्ध सदस्यांचा समावेश आहे. सर्वांचे मृतदेह एका कारमध्ये आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ११२ नंबरवर माहिती मिळाली की, पंचकुला शहरातील सेक्टर-२७ मधील घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये काही लोक विष प्राशन करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमधील सहा जणांना सेक्टर-२६ मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच डीसीपी हिमाद्री कौशिक आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. या गाडीच्या नंबरवरून डेहराडूनची असल्याचे सांगितले जात आहे. मृतांपैकी दोघांची ओळख प्रवीण मित्तल आणि त्यांचे वडील देशराज मित्तल अशी आहे.
प्रवीण मित्तल यांनी काही काळापूर्वी डेहराडूनमध्ये टूर अँड ट्रॅव्हल व्यवसाय सुरू केला होता, जो फारसा चालला नाही. त्यात त्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे कुटुंब कर्जात बुडाले. परिस्थिती इतकी वाईट होती की कुटुंब जगूही शकले नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.