
मुंबई शहर आणि उपनगरातील जोरदार पाऊसाने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. लोकलची वाहतूक देखील मंदगतीने सुरु असून मेट्रोती तीनच्या सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.
पावसाने मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो अंडर वॉटर झाली, आचार्य अत्रे स्थानकात पाणीच पाणी…
मुंबई प्रतिनिधी- मुंबईत मान्सूनने वेळेआधीच दमदार हजेरी लावली. त्याचा तडाखा मुंबईतील सखल भागासह सर्वात भरोसेमंद असलेल्या अंडरग्राऊंड मेट्रो सेवेलाही बसला. मुंबई मेट्रो तीनच्या बाबतचे सर्व दावे पोकळ ठरले. मुंबईतील पावसाने मुंबई मेट्रो तीनच्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या टप्पा क्रमांक २ अ च्या वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकात सोमवारच्या पावसाने पाणी शिरले. या स्थानकात पाण्याचे धबधबे सुरु असल्याचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागले. यामुळे या अंडरग्राऊंड मेट्रो तीन अॅक्वा लाईन खरोखरच पाण्यात गेल्याचे दृश्य दिसू लागल्याने राजकारणी लोकांनी देखील वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले.
पावसाळ्याच्यास्थितीसाठी मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोस सुरक्षित आणि निर्धोक बनवण्यात आल्याच्या सर्व दाव्यांची पोलखोल या पावसाने केली आहे. कुलाबा ते सीप्झ मेट्रो तीनचा पहिला टप्पा बीकेसी ते आरे कॉलनी सुरु झाल्यानंतर दुसरा टप्पा भाग १ बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी शिरल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. या स्थानकातील प्रवाशांनी मेट्रोच्या स्थानकात भरलेल्या पाण्याचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल केल्याने एमएमआरडीए आणि एमएमआरसीएलने मेट्रो तीनचे ऑपरेशन स्थगित केले.
मेट्रो तीनच्या वरळीतील आचार्यअत्र चौक स्थानकात पाणी भरल्यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यानी या संदर्भातील व्हिडीओ शेअर करीत सरकारवर जोरदार टीका केली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचे सर्व दावे पाण्यात बुडले आहेत. मेट्रो तीनच्या आचार्य स्थानकाच्या छतातून पाणी गळत आहे. पायऱ्यांवरुन पावसाचे पाणी पायऱ्यांवरुन अक्षरश: धबधब्यासारखे वाहत आहे.
मेट्रोस्थानकाच्या बांधकामाचे सेफी ऑडीट करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले होते उद्घाटन
मेट्रो ३ च्या बीकेसी ते वरळी या फेज २ चे उद्घाटन ( सहा स्थानके ) अलिकडेच १० मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. ३३.५ किलोमीटर मार्गाच्या कुलाबा -बीकेसी- सीप्झ मेट्रो ३ चे उद्घाटन ऑगस्ट महिन्यात करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. या संपूर्ण ३३.५ किमी अंडरग्राऊंड मार्गिकेवर एकूण २७ स्थानके असून ( २६ अंडरग्राऊंड आणि एक ग्रेड लेव्हल ) हा भुयारी रेल्वेचा प्रकल्प मुंबईकरांसाठी महत्वाचा आहे.