
*मुंबई-* देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून आज अरबी समुद्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात साधारण 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच मान्सूनबाबत आनंदवार्ता आली आहे. हवामानतज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी मान्सूनबाबत महत्वाचे अपडेट दिले आहेत. होसाळीकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ‘अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून आज ( दि. 15 ) अरबी समुद्रात पोहचला आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकरत आहे. मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकता दिसत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील चार आठवड्यात मोसमी वारे अर्थात पावसाचा प्रवास समाधानकारक वेगानं होणार असून, येत्या चार आठवड्यांत देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढणं अपेक्षित आहे. ज्यामुळं वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याच आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
मान्सूनच्या आगमनाचं एकंदर चक्र पाहिल्यास साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो केरळमध्ये धडकतो आणि पुढं कोकण, मध्य महाराष्ट्र करत देशाच्या उर्वरित भागांना व्यापतो. यंदा केरळतच मान्सून वेळेआधी आला, तर तो महाराष्ट्राची वेसही वेळेआधीच म्हणजेच 6 जूनपूर्वीच ओलांडू शकतो असं म्हणायला हरकत नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास वेग) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (50-60 किमी प्रतितास वेग), मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.