
सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी शनिवारी शिर्डीला भेट देत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी चीनविरोधात आम्ही सर्वपरीनं तयार असल्याचं स्पष्ट केलं.
शिर्डी : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी शनिवारी त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसोबत शिर्डीत साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं. “लहान होतो तेव्हापासून साईबाबांचा मी भक्त आहे. मात्र कधी शिर्डीला येणं झालं नाही. साईबाबांचं बोलवणं आल्यानं शिर्डीला साई दर्शनासाठी पहिल्यांदाच येणं झालं आहे. दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणार आहे,” अशी इच्छा यावेळी मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी व्यक्त केलीय. “सिक्कीम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात साईबाबांचं मंदिर आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी चीन आणि भारत संबंधाबाबत बोलताना “चीनविरोधात आम्ही सर्वपरीनं तयार आहे,” असंही स्पष्ट केलं.

तिब्बत पठारावर भारतीय सैन्याचं शक्ती प्रदर्शन….
अलिकडंच उत्तर सिक्कीम हिमालय पार तिब्बत पठारावर भारतीय सैन्यानं पहिल्यांदाच शक्ती प्रदर्शन केलंय. याच कौतुक करत, “2014 नंतर सैन्य दल मजबूत झालं असून शक्तीशाली झालं आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कामाला संपूर्ण पाठींबा असून भाजपा हा मोठा भाऊ आहे. पंतप्रधान मोदी सिक्कीमवर खूप प्रेम करत असल्यानं त्यांना मोठा भाऊ मानतो,” असं देखील असं देखील मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी स्पष्ट केलं.
चीन विरोधात आम्ही सर्वपरीनं तयार….
सिक्कीम सिमावर्ती राज्य असून चीन-नेपाळ-भूतान अशा तीन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमाशी संलग्न आहे. डोकलाम वादानंतर चीन बॉर्डरचा विषय अधिक संवेदनशील झाला. मात्र आता शांतता असून लवकरच मानसरोवर यात्रा सुरु होण्याच्या तयारीत आहे. चीन विरोधात आम्ही सर्वपरीनं तयार आहोत, असं देखील मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांसह या मंत्र्यांनीही दिली शिर्डीला भेट…
सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्यासह इमारत आणि गृह निर्माण व कामगार श्रमिक मंत्री एम एन शेरपा, विधानसभा अध्यक्ष राज कुमारी थापा, विधानसभा उपाध्यक्ष यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल साई मूर्ती देऊन या सर्वांचा सत्कार केला.