
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा वकिली सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील रूम क्रमांक ११ मध्ये झाली. नवीन कार्यकारिणी २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे.
सकाळी निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती आंबेकर व श्री. खांडेकर उपस्थित होते. सुरवातीला वकिलांमध्ये कोणते पॅनल निवडून येणार याबाबत उत्सुकता होती व तशी चर्चा रंगली होती. दुपारी बारा वाजल्यानंतर अर्ज वितरणास सुरवात झाली. त्यावेळी परिवर्तन पॅनलच्या ॲड. सुरज बने, ॲड. रजपूत, ॲड. शिवराज जाधव, ॲड. सचिन पारकर, ॲड. अल्तमश झारी, ॲड. राहुल चाचे, ॲड. दीपा रसाळ, ॲड. भोसले, ॲड. कार्तिकी शिंदे, ॲड. प्रसाद कुवेस्कर यांनी प्रथम अर्ज भरले. काही जागा रिक्त असल्याने रत्नागिरी बारचे उपाध्यक्ष ॲड. निनाद शिंदे आणि रत्नागिरी बार असोसिएशनचे सचिव ॲड. रत्नदीप चाचले यांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला. या दाखल झालेल्या अर्जाविरुद्ध कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने ही बिनविरोध जाहीर झाली.
रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.. जी. एन. गवाणकर यांनी सहकार धोरण कसे असावे आणि संस्थेची वाटचाल वकिलांच्या भल्यासाठी कशी व्हावी, याबद्दल मार्गदर्शन केले.
नवनियुक्त सदस्य ॲड. शशिकांत सुतार यांनी सहकार क्षेत्रातील अनुभवाने या संस्थेचा कल्पवृक्ष कसा होईल, याबद्दल सभासदांना ग्वाही दिली. खेड येथील ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद जाडकर यांनी सभासदांच्या ठेवी आणि संस्थेचे कार्य प्रत्येक वकिलापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. रत्नागिरी बारचे ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश उर्फ भाऊ शेट्ये यांनी सहकार आणि संस्थेची कार्य यात घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.
नवनियुक्त सदस्य तथा बार असोसिएशनचे सचिव ॲड. रत्नदीप चाचले यांनी सर्व सभासद आणि निवडणूक प्रक्रियेसाठी उपलब्ध झालेले शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
*विजयी उमेदवारांची नावे*
दापोली- खेड मतदारसंघ- ॲड. मिलिंद जाडकर (खेड), ॲड. प्रथमेश भोसले (दापोली), गुहागर चिपळूण- ॲड. दीपा रसाळ (चिपळूण), ॲड. राहुल चाचे (गुहागर), रत्नागिरी तालुका- ॲड. सचिन पारकर (बेनी), ॲड. रत्नदीप चाचले (नाचणे), रत्नागिरी मुख्यालय ॲड. सुरज बने, ॲड. निनाद शिंदे, ॲड. अल्तमश झारी, राजापूर- ॲड. शशिकांत सुतार, महिला मतदारसंघ- ॲड. गौरी देसाई, ॲड. कार्तिकी शिंदे, भटक्या विमुक्त जाती व जमाती- ॲड. प्रथमेश रजपूत. इतर मागासवर्ग- ॲड. प्रसाद कुवेस्कर, अनुसूचित जाती जमाती- ॲड. शिवराज जाधव.