औरंगजेबाची कबर नष्ट करा:शिवसेना MP नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी; ASI संरक्षित स्मारक व कबरींची आकडेवारीच केली सादर….

Spread the love

*नवी दिल्ली-* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआने संरक्षित केलेल्या देशातील 3,691 स्मारक व कबरींपैकी 25 टक्के कबरी व स्मारके ही देशाच्या संस्कृतीविरोधात काम करणाऱ्या मोगल व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या असल्याचे ते म्हणालेत.

खासदार नरेश म्हस्के लोकसभेत बोलताना खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली. सभागृहाच्या शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के सभागृहात म्हणाले की, “औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर संरक्षित करण्याची काहीच गरज नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) द्वारा संरक्षित 3,691 स्मारके आणि कबरींपैकी 25 टक्के मुघल आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या आहेत, ज्यांनी देशाच्या संस्कृती आणि परंपरांच्या विरोधात काम केले.”

*क्रूर औरंगजेबाची कबर जतन करण्याची गरज नाही…*

नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली व लुटली. औरंगजेबाने शिखांच्या नवव्या आणि दहाव्या गुरूंचीही हत्याकेली. त्याची कबर खुलताबादमध्ये आहे. ती ASI ने संरक्षित केली आहे. औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर जतन करण्याची काय गरज आहे? औरंगजेबासह भारताविरोधात काम करणाऱ्या सर्वांची स्मारके नष्ट करावीत.

*अबू आझमींच्या विधानामुळे वातावरण तापले..*

महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या एका विधानामुळे औरंगजेबाचा वाद तापला आहे. मुंबईतील एका न्यायालयाने मंगळवारी अबू आझमी यांना औरंगजेबाची प्रशंसा केल्याप्रकरणी त्यांच्यावर दाखल गुन्ह्याप्रकरणी जामीन मंजूर केला होता. आझमी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांची टिप्पणी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा अपमान करण्यासाठी किंवा धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेली नाही.

मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघाचे आमदार आझमी यांच्यावर मुघल बादशहाची स्तुती केल्याप्रकरणी बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*काय म्हणाले होते अबू आझमी?…*

औरंगजेबाच्या कारकिर्दीचा संदर्भ देत आझमी यांनी दावा केला होता की, ” औरंगजेबाच्या काळात भारताचा जीडीपी (जागतिक जीडीपी) 24 टक्के होता आणि त्यावेळी भारताला सोन्याची खाण म्हटले जात होते. यावेळी त्यांना औरंगजेब आणि मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील युद्धाविषयी छेडले असता ते हा धार्मिक नव्हे तर राजकीय लढा असल्याचे म्हणाले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page