
रत्नागिरी : जिद्ध, चिकाटी, अपार कष्टाच्या जोरावर खो खो खेळातील सर्वेच शिवछत्रपती पुरस्कारला गवसणी घालणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, उद्यमनगर येथील ऐश्वर्या यशवंत सावंत हिचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून ऐश्वर्या सावंत ही रत्नागिरीतील क्रीडा कार्यालयात क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग २ पदावर रुजू झाली आहे. तीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रत्नागिरीतील उद्यमनगर येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेली ऐश्वर्या सावंत हिचे प्राथमिक शिक्षण दामले विद्यालय येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणसाठी तिने रा. भा. शिर्के प्रशालेत प्रवेश घेतला. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या ऐश्वर्या सावंत हिने शिर्के प्रशालेतर्फे शालेय स्पर्धांमध्ये खेळताना आपल्यातील खो-खो खेळाची चुणूक दाखविली. तिच्याबद्दल खेळातील गुण ओळखून क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांनी तिला प्रथम प्रोत्सहान दिले. घरची आर्थिक स्थिती बेताची असतानाही ऐश्वर्याने चिकाटी सोडली नाही. भल्या पहाटे उठून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिमवर जाऊन न चुकता सराव करण्यात तिने सातत्य ठेवले होते.
तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत असतानाच तिने आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या खो-खो खेळाची चुणूक दाखविली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून बीएची पदावी घेतलेल्या ऐश्वर्या सावंत हिने इयत्ता ७ पासून खो-खो खेळाला सुरुवात केली. इयत्ता ९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभाग घेतला. १८ वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत (जानकी पुरस्कार सन २०१४-२०१५), खुल्या गटातील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत (राणी लक्ष्मी पुरस्कार २०१६), एकूण २० राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतसहभाग, एशियन खो-खो स्पर्धेत चॅम्पियनशिप २०१६ (गोल्ड मेडल, इंदोर), अंतराराष्ट्रीय खो-खो स्पर्धा २०१८ (गोल्ड मेडल, लंडन), साऊथ एशियन खो-खो स्पर्धा २०१९ (नेपाळ) सहभाग नोंदविला. त्यानंतर राज्य सरकारचा मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०१७-१८ ऐश्वर्याला प्राप्त झाला.
राज्य सरकारमार्फत ऐश्वर्याला थेट नियुक्ती देण्यात आली. क्रीडा विभागाच्यावतीने तीची नियुक्ती रत्नागिरीतील जिल्हा कार्यालयात क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग २ पदावर करण्यात आली आहे. नुकताच तीने आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे. तीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.