
फिशरी कंपन्या रात्री बंद ठेवण्याचा सूचना …
*रायगड l 20 फेब्रुवारी-* पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील १५ कारखाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सील केले असून २०० कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तळोजा एमआयडीसी फिशरी कंपन्या रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा प्रस्तावसुद्धा एमपीसीबी ने केला असल्याची माहिती देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये हवा आणि पाण्याचे वाढते प्रदूषण लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विभागीय कार्यालयात मंगळवारी (१८ फेब्रुवारी) बैठक घेतली. तळोजा परिसरात ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी बसविण्यात आली असून या ठिकाणी आजमितीला ८२३ छोटे- मोठे कारखाने आहेत. त्यामध्ये इंजिनीअरिंग, फिश, फूड, केमिकल्स आदी कारखानांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत ही एमआयडीसी प्रदुषणाचे माहेरघर म्हणून ओळखली जात आहे. कारखाने रसायनमिश्रीत पाणी नदीत त्याचबरोबर पावसाळी नाल्यात सोडतातच त्याशिवाय रासायनिक सांडपाण्यावर सीईटीपीत शास्त्रशुध्द पध्दतीने प्रक्रिया केली जात नाही. या कारणाने कासाडी नदी आणि कामोठे खाडी काळवंडली आहे. रासायनिक कारखाने मोठ्या प्रमाणात प्रदुषण करत आहेत.
अतिशय विषारी वायू हवेत सोडले जात असल्याने त्याचा त्रास आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच सिडको वसाहतीतील रहिवाशांना होत आहे. काही कारखाने मोठ्या प्रमाणात गॅस रात्रीच्या वेळी हवेत सोडत असल्याने नागरिकांना श्वास घेणेही कठीण होवून बसले आहे. तसेच डोक दुखणे, डोळे चुरचुरणे, चक्कर येणे आदी त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढत्या हवेच्या आणि पाण्याच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या विभागीय कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी विभागीय प्रादेशिक अधिकारी पडवळ व भोसले यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत नागरिक व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रदूषणविषयक समस्या मांडत ठोस कारवाईची मागणी केली. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांवर थेट सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणार्या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली. रात्रीच्या वेळी फिशिंग कंपन्यांवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्यावतीने मान्य करण्यात आली. या बैठकीत भाजपा उत्तर रायगड सचिव कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, हैप्पी सिंग, यांच्यासह नागरिक व विविध संस्थांचे प्रतिनिधींनी उपस्थित होते.