पैसा फंडच्या कला साधना चित्रकला वार्षिकची रौप्य महोत्सवी वाटचाल! ; २६ जानेवारीला प्रकाशित होणार २५ वे कला वार्षिक, प्रशालेकडे १५०० बालकलाकृतींचा संग्रह!…

Spread the love

पैसा फंडच्या कला साधना चित्रकला वार्षिकची रौप्य महोत्सवी वाटचाल! ; २६ जानेवारीला प्रकाशित होणार २५ वे कला वार्षिक, प्रशालेकडे १५०० बालकलाकृतींचा संग्रह!

जे डी पराडकर/संगमेश्वर- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर या प्रशालेतील कला विभागाने स्पर्धेच्या या युगात कला विषयासाठी काही आगळे वेगळे प्रयोग करण्याचे ठरवले. याचाच एक भाग म्हणून सन २००० साली त्यावेळच्या इयत्ता दहावी मधील कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाकृतींचा संग्रह असणारे ‘ कलासाधना ’ हे पहिले चित्रकला वार्षिक तयार केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या पहिल्या कलासंग्रहाचे प्रकाशन २६ जानेवारी २००० साली करण्यात आले होते. यानंतर सलग २५ वर्ष हा उपक्रम सुरू असून. यावर्षी कला साधना चित्रकला वार्षिक आपला रौप्य महोत्सव साजरा करीत आहे.

कलासाधना चित्रकला वार्षिक मध्ये प्रशालेतील कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कलाकृतींचा समावेश केला जातो. या वार्षिक मध्ये आपली कलाकृती समाविष्ट व्हावी म्हणून कलेची आवड असणारे विद्यार्थी वर्षभर कमालीची मेहनत घेत असतात. यामधून विद्यार्थ्यांमध्ये परस्परात एक स्पर्धाही निर्माण होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलाकृती दर्जेदार बनत जातात. या चित्रकला वार्षिकचा उपयोग शासकीय रेखाकला परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसह शासनातर्फे काही विशिष्ट उपक्रमा दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रकला स्पर्धा मध्ये मार्गदर्शक म्हणून चांगला उपयोग होतो. कला साधना चित्रकला वार्षिक मध्ये शासकीय रेखा कला परीक्षांमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व विषयांवर आधारित चित्रे असतातच शिवाय विद्यार्थ्यांना भविष्यात कलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी उपयुक्त होतील, असे मुद्राचित्रण, कोलाज, रेखाटन आणि अक्षर लेखन अशा विषयांचा देखील समावेश असतो.

एका चित्रकला वार्षिक मध्ये सरासरी ६० कलाकृतींचा समावेश असतो. यानुसार २५ कलासाधना मध्ये एकूण १५०० बालकलाकृतींचा संग्रह प्रशालेच्या कला विभागाकडे एकत्रित झाला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाचा लाभ होऊन अनेक विद्यार्थी उच्च कला शिक्षणाकडे वळले. प्रशालीच्या कला विभागाने सन २००८ – ०९ साली प्रशालेत स्वतंत्र कला वर्गाची उभारणी केली. या कलावर्गात राज्यातील नामवंत कलाकारांची प्रात्यक्षिके दरवर्षी आयोजित केली जातात. याचा कलेचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगलाच उपयोग होतो. गत दोन वर्षांपासून कला वर्गात विद्यार्थ्यांना डिजिटल कलाशिक्षण दिले जात आहे. कोरोनाच्या कालावधीत प्रशालेचे जी डी आर्ट शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी हेमंत यशवंत सावंत आणि प्राची जनार्दन रहाटे यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने प्रशालेत आर्ट गॅलरीची निर्मिती करण्यात आली आहे. या गॅलरीत नामवंत चित्रकारांच्या ७० कलाकृती असून, १० उत्कृष्ट अशी शिल्पे देखील आहेत. पैसा फंड कलादालनाला भेट देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कलारसिक येत असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष, माध्यमिक – प्राथमिकचे शिक्षण अधिकारी, लोकप्रतिनिधी, कलारसिक, नामवंत चित्रकार – शिल्पकार, शासनाचे वरिष्ठ अधिकारी आदींनी पैसा फंड कलावर्ग आणि कलादालनाला भेट देऊन विविध उपक्रमांचे कौतुक केले आहे.

कलासाधना चित्रकला वार्षिकला २६ जानेवारी २०२५ रोजी २५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल. या रौप्यमहोत्सवी चित्रकला वार्षिकच्या प्रकाशना बरोबरच प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तसेच शासकीय रेखाकला परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र प्रदान आणि बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी कलासाधना चित्रकला वार्षिकच्या रौप्य महोत्सवाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page