![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2025/01/1001003825.jpg)
बेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झाली. या विनाचालक धावणाऱ्या भरधाव बसने दोन जणांना उडवलं व टी स्टॉलवर जाऊन आदळली.
मुंबई /प्रतिनिधी- मुंबईतील कुर्ला परिसरात भरधाव बसने चिरडल्याने १० हून अधिक पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता विक्रोळीत एक विचित्र अपघात समोर आला आहे. विक्रोळी कन्नमवार नगर परिसरात बेस्ट बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात झाला. बस तशीच सुरुच ठेवून चालक खाली उतरला आणि बसने वेग पकडत रस्त्यावरील २ लोकांना धडक दिली, या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
विक्रोळीतील या घटनेमुळे पुन्हा एकदा बेस्ट बसच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चालक बस सुरु ठेऊन नियंत्रण कक्षात गेल्यानंतर हा प्रकार घटला.
नेमका प्रकार काय?
शनिवारी सकाळच्या सुमारास विक्रोळी भागातील कन्नमवारनगर येथे बेस्ट बस चालकाने स्टॉपवर बस थांबवली व बस सुरू ठेवून तो नियंत्रण कक्षात गेला. यावेळी ही बस अचानक सुरू झाली आणि बसने वेग पकडला. ही बस जवळ असणाऱ्या एका चहाच्या टपरीवर आदळली. या घटनेत दोन जण गंभीर झाले आहेत. हा सर्व प्रकार पाहून बेस्ट चालकांचा हलगर्जीपण पुन्हा समोर आला असून यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट ऊसळली आहे.
कन्नमवार नगर येथील बेस्ट बस स्थानकात नियंत्रण कक्ष देखील आहे. यामुळे बेस्ट बस चालकांना येथ बस आल्यानंतर तसेच निघण्यापूर्वी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून नोंद करावी लागते. येथे एक बेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झाली. या विनाचालक धावणाऱ्या भरधाव बसने दोन जणांना उडवलं व टी स्टॉलवर जाऊन आदळली.
कन्नमवारनगर ही नेहमी लोकांच्या वर्दळीने गजबजलेला परिसर असतो. मात्र आज शनिवार असल्यामुळे गर्दी नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. येथून जवळच दोन महाविद्यालयेही आहेत. बस चालकाने निष्काळजीपणे बस सुरुच ठेवली आणि तो डेपोतील नियंत्रण कक्षातील स्वच्छतागृहात निघून गेला.
चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू कशी झाली? बसने वेग कसा पकडला? हा प्रकार कसा घडला? याची चौकशी बेस्ट प्रशासन करणार आहे.