![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/12/1000974529.jpg)
नेरळ (माथेरान): सुमित क्षिरसागर- नेहमी प्रमाणे माथेरान वाहन तळ येथील पार्कींगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दरम्यान वाहन पार्किंग फुल झाल्याने विकेंडला माथेरानला आज घाटात पार्किंगपासून अडीच किलोमीटर रांगा वाहनांच्या लागल्या होत्या. यामुळे काही काळ येथील वाहतूक व्यवस्था खोळंबून पर्यटकांना चांगलाच मनस्ताप भोगावा लागला आहे. दरम्यान पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर काही तासात ही वाहतूक कोंडी सोडवून पर्यटकांना दिलासा दिला.मात्र वाहतूक कोंडीत अडकलेल्या पर्यटकांनी वाहनातून उतरून पायी चालणे पसंद केले.31 डिसेंबर जवळ आल्याने आज रविवार सकाळ पासून पर्यटकांचा लोंढा माथेरानच्या दिशेने वळलेला दिसला.
जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. दरम्यान शनिवार रविवार विकेंडला माथेरानला येणार्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते अशातच 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येणाऱ्या 2025 वर्षाच्या स्वागतासाठी आज माथेरानला पर्यटक मौज मजा करण्यासाठी आले होते. छोटे हिल स्टेशन म्हणून आणि मुंबई पुणे या शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणून सर्वाधिक पसंती पर्यटक माथेरानला देतात, परंतु माथेरान फिरण्यासाठी येणार्या पर्यटकांना गेली कित्येक वर्षे वाहन पार्कींगच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. येथील अपुरी वाहन पार्किंग व्यवस्था येणार्या पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.त्यातच आज 29 डिसेंबर रविवार विकेंड असल्याने वर्षाचा शेवट एंजॉय करण्यासाठी पर्यटकांचा लोंढा माथेरान दिशेने वळला होता. आज माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन पार्किंग सेवा नियोजन अभावी लवकरच फुल झाल्याने येणार्या पर्यटकांची वाहने नेहमीप्रमाणे दस्तुरी वाहन तळ येथून ते गारबट जाणार्या रस्त्यावर म्हणजेच साधारण अडीच तीन किलोमीटर रांगा वाहनांच्या घाटात दिसत होत्या. घाटात झालेली वाहनांची ही गर्दी दोन्ही दिशेने जाणार्या वाहनांना अडचण ठरत होती. त्यामुळे तासंतास पर्यटकांना आपल्या वाहनात अडकून पडावे लागले. काही पर्यटकांनी वाहनातून उतरून माथेरान गाठले तर काही तासानंतर वाहतूक कोंडी सुटल्यानंतर माथेरान दस्तुरी नाका येथे पोहचले होते. यावेळी नेरळ पोलीस व माथेरान पोलीस यांनी आपली कामगिरी चोख बजावली. मात्र नेहमीचीच बनलेली वाहतूक पार्किंग व्यवस्था प्रश्न ऐरणीवर आला.
नेरळ माथेरान नेरळ सेवा देणारे चालक यांना देखील ह्या वाहन गर्दीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन तळाची जागा वाढवण्याचे प्रशासनाने नियोजन केले गेले पाहिजे म्हणून पुन्हा एकदा मागणी पुढे आली आहे. अपुर्या जागे अभावी वाहन पार्किंग सेवा फुल होते आणि याचा फटका येणार्या पर्यटकांवर होत आहे. बहुतेक पर्यटक हे खाजगी वाहनाने माथेरान फिरण्यासाठी पसंत करतात. एक दिवसाची सुट्टी माथेरान येथे घालवून पुन्हा घरी जाण्यासाठी म्हणून पर्यटक माथेरान हे थंड हवेचे जवळचे ठिकाण म्हणून पसंती देत असून पर्यटकांना जर अशा अडचणी होत असतील तर माथेरानला पर्यटकांची होणारी गर्दी यामुळे कमी होईल, असेही येथील वाहन चालक व पर्यटक सांगत आहेत. आज वाहन कोंडी सोडवण्यासाठी सकाळपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना माथेरान घाटात अडकून पडावे लागले होते.
*पर्यटकांची पायपीट…*
घाट रस्त्यात गेली दोन दिवस दररोज वाहतूक कोंडी होत असून त्यावेळी प्रवासी टॅक्सी मधून माथेरान येत असलेल्या पर्यटकांना नाईलाज म्हणून दोन किंवा तीन वळणे आधीच उतरून चढाव चढून जाण्याची वेळ येताना दिसून येते.
*वाहतूक कोंडीमुळे वाहनांचे नुकसान..*
नेरळ माथेरान घाट हा देशातील अवघड वळणे वसलेला घाट समजला जातो.त्यामुळे चढाव पार करीत असलेली वाहने वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास थांबून राहतात.त्यावेळी पुन्हा पिकअप घेताना वाहने गरम होतात आणि त्यामुळे वाहनांच्या कलच प्लेट यांचे नुकसान होत असते.
*माऊंट बेरी येथे वाहनतळ विकसित करावे….*
माथेरान मध्ये आपली वाहने घेवून येणार्या पर्यटकांची वाहने ही वाहनतळ येथे जात असतात.मात्र प्रवासी टॅक्सी यांच्यासाठी कुठेही वाहनतळ नाही आणि त्यामुळे शासनाने दस्तुरी येथील माऊंट बेरी भागात प्रवासी टॅक्सीचे वाहनतळ उभारण्यात यावे.
टॅक्सी चालक मालक संघटना नेरळ
नरेंद्र कराळे (अध्यक्ष)