मनमोहन सिंग यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रातून दु:ख व्यक्त; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्यासह शरद पवार यांनी काय म्हटलं?…

Spread the love

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातील नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष (एसपी) शरद पवार या नेत्यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली/मुंबई- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, “मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा आम्ही नियमितपणे बोलायचो. शासनाशी संबंधित विविध विषयांवर आम्ही सखोल चर्चा करायचो. त्यांची बुद्धी आणि नम्रता नेहमीच दिसून आली. भारतातील सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानं दु:ख वाटत आहे.

▪️”माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून ते देशाचे अर्थमंत्री, पंतप्रधान म्हणून देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे”, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं, “भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानं अत्यंत दु:ख झाले. त्यांनी संकटाच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची सेवा आणि विद्वतेमुळे त्यांचा सर्वत्र आदर केला जात होता. भारताच्या प्रगतीत त्यांचे योगदान स्मरणात कायम राहील”.

▪️भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले, “माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. ते एक दूरदर्शी आणि भारतीय राजकारणातील एक दिग्गज नेते होते. त्यांचे कार्य राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नासाठी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील”.

▪️केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, “त्यांनी नेहमीच देशाचे कल्याण केले. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो”.

▪️माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, “माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांच्या निधनानं खूप दु:ख झाले आहे. मनमोहन सिंग हे नम्रता, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक होते. देशाच्या आर्थिक सुधारणांपासून ते पंतप्रधान म्हणून त्यांच्या नेतृत्वापर्यंत त्यांनी अथकपणे देशाची सेवा केली”.

▪️”अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले.

▪️”भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल”, असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले. “

भारताने एक महान सुपुत्र गमावला-

“देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत,” अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले यांनी म्हटलं की, डॉ. मनमोहन सिंह यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली.त्यांचा दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे”.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page