संगमेश्वर :- तालुक्यातील डिंगणी चाळकेवाडी येथे मिलिंद धोंडू चाळके यांच्या काजू बागेत वणवा लागून यात सुमारे २५ काजूची कलमे जळून खाक झाली आहेत.
मंगळवारी दुपारनंतर ही घटना घडली. मिलिंद चाळके यांची घरापासून काही अंतरावर असलेल्या बागेतून आगीचे लोळ दिसू लागल्याने लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. बागेत गवत असल्याने आगीने रौद्ररूप धरण केले होते. बागेत वाढलेले सुके गवत असल्याने आगीचा भडका चांगलाच उडाला होता. ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
चाळके यांनी काजू कलमे लावून ते वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. झाडे सुद्धा मोठी झाली होती. ती झाडे एक -एक करून आगीच्या भक्षस्थानी पडली. अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्यात ग्रामस्थांना यश आले; अन्यथा आजबाजूच्या बागेलाही या आगीचा धोका होता. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. या आगीत दरवर्षी पीक देणारे काजू झाडे जळून खाक झाली आहेत. याची माहिती डिंगणी पोलिस पाटील नितीन मोहिते यांनी दिली. डिंगणी सजाचे तलाठी सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.