चिपळूण :- रेल्वे पोलिसाला हाणामारी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून रत्नागिरी येथील आरोपी सरजिल अब्दुल सत्तार पिलपिले (रा. मिरजोळे, रत्नागिरी ) याला तीन वर्षांची सक्तमजुरी आणि १२ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
चिपळूण येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी बाजू मांडली. दि. २६ एप्रिल २०१८ रोजी ही घटना घडली होती. रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा मारहाणीचा प्रकार घडला. आरोपी सरजिल पिलपिले व त्याचा भाऊ आसिफ पिलपिले हे दोघे मुंबईला चालले होते. मात्र, आरक्षित डब्याचे तिकीट नसताना त्यांनी आरक्षित डब्यात प्रवेश केला व तेथील प्रवाशांशी हुज्जत घालू लागले. यावेळी टीसी त्यांच्या डब्यात दाखल झाल्यावर त्यांनी तिकीट तपासणी केली असता त्यांच्याशीही त्यांनी वाद घातला. टीसीने त्यांना अनारक्षित डब्यात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी तो धुडकावत लावून एसीमधील प्रवाशांसोबत वाद सुरू केला. यानंतर टीसीच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी रेल्वे पोलीस गोरखनाथ शेळके, वसीम खान हे रेल्वे डब्यात दाखल झाले व संबंधितांना ताकीद दिली असता आरोपी सरजिल पिलपिले याने पाण्याची बाटली पोलिसांच्या डोक्यात घातली व त्यांनाच मारहाण केली. अखेर या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शेळके यांच्याकडे होता. या प्रकरणी न्यायालयाने आठजणांची साक्ष
तपासली. अखेर या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी सरजिल पिलपिले याला तीन वर्षे सक्तमजुरी व बारा हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील सरजिलचा भाऊ आसिफ हा फरार असून त्याचा शोध लागलेला नाही. या तपासासाठी येथील पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे, पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार विनायक चव्हाण यांनी सहकार्य केले. तर हा खटला सरकारी वकील ॲड. पुष्कराज शेट्ये यांनी लढविला. त्यांना ॲड. अनुपमा ठाकूर यांनी सहाय्य केले.