खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाकानजीक बुधवारी पहाटे चालकाचे नियंत्रण सुटून टँकर नदीपात्रात कोसळून मोठा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाला झोप अनावर झाल्याने टँकरवरील त्याचे नियंत्रण सुटले व टॅंकर थेट नदीत कोसळला. सुदैवाने अपघातात टँकर चालक बचावला आहे. हा टँकर मुंबईच्या दिशेने जात होता. खेड तालुक्यातील भरणे नाकानजीक जगबुडी नदीवरील पुलाजवळ आल्यानंतर टॅंकर चालकाला झोप अनावर झाल्याने टँकरवरील त्याचा ताबा सुटला. टँकर नदीत कोसळताना चालकाने लगेच उडी मारल्याने तो यातून बचावला. मात्र टँकर दोन पुलांच्या मधून उभाच सरळ खाली नदी पात्रात कोसळल्याने टँकरचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिस घटनास्थळी पोहोचले.