सिंधुदुर्ग: वैभववाडी ते कोल्हापूर असा नवा रेल्वेमार्ग केवळ कोकणसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरणार आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे.आता वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची आग्रही मागणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन केली. यावेळी कोकण रेल्वेच्या अनेक समस्या, स्थानकाचे प्रश्न मांडतानाच मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेच्या थांबे देण्याबाबतही त्यांनी रेल्वे मंत्र्याचे लक्ष वेधले. जिल्हा मुख्यालयातील सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकांवरील सुविंधाबाबतही खासदार नारायण राणे यांनी सांगतानाच या रेल्वेस्थानकावर ४ एक्सप्रेसना थांबा मिळण्याची मागणीही केली. कोल्हापुर मार्गाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी रेल्वेमंत्र्यांनी आश्वासीत केले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटी दरम्यान नारायण राणे यांनी आपल्या मागण्यांबाबत निवेदनही सादर केले. रेल्वेमंत्र्याचे लक्ष वेधताना २०१६ रोजी घोषणा झालेला प्रस्तावीत वैभववाडी- -कोल्हापुर (आचीर्णे जंक्शन) रेल्वे लाईन निर्मीतीला चालना देण्याची मागणी केली. निवेदनात राणे म्हणतात,वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे लाईन बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६ मध्ये केली होती. तेव्हापासून मी या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहे. या रेल्वे मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद केली, परंतु रेल्वे बोर्डाने त्यास मान्यता दिलेली नाही यामुळे हा प्रकल्प मागे पडत आहे.
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाची लांबी १०७ किमी आहे. कोल्हापूर-वैभववाडी सेक्शनचे बांधकाम केवळ कोकण रेल्वेसाठीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरेल. हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडेल, किनारपट्टीच्या प्रदेशात बंदरे आणि बंदरांचा विकास करेल आणि सीमावर्ती भागातून किनाऱ्यापर्यंत मालाची वाहतूक सोपी होईल.राज्य विकासाची नवी भरारी घेईल.म्हणून आपणास विनंती आहे की आपण या प्रकरणी वैयक्तिकरित्या लक्ष घालून वैभववाडी कोल्हापूर रेल्वे लाईनचे बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची सूचना संबंधितांना करावी.अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे