रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातून गायब झालेल्या थंडीने पुन्हा चांगलाच जोर धरल्याने संपूर्ण जिल्हा थंडीने गारठला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हात देखील थंडीची लाट आली आहे. दापोलीत सर्वात जास्त थंडी पडल्याची नोंद करण्यात आली असून या तालुक्यात किमान तापमानाची नोंद ७.८ अंश इतकी नोंदवण्यात आली आहे. मात्र यावर्षी आंबा काजू बागायतीला थंडी पोषक असल्याने आणि झाडे मोहरु लागल्याने मोठे उत्पादन या बागायतीमधून मिळण्याची आशा आंबा काजू व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
दापोलीसह जिल्ह्यातील काही भागातून काही काळ थंडी गायब झाली होती. मात्र आता पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे. १६ डिसेंबरपासून थंडीची पुन्हा सुरुवात झाली आहे. दापोली तालुक्यात सर्वात जास्त थंडी पडत असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यापूर्वी दापोली येथे २ जानेवारी १९९१ मध्ये ३.४ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदविले गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ३ जानेवारी १९९१ रोजी ते ३.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. ९ फेब्रुवारी २०१९ या वर्षी ४.९ अंश इतके नीचांकी तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी १४ डिसेंबरपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने १४ डिसेंबर रोजी कमाल ३२.५ अंश, तर किमान तापमान १८.८, १५ डिसेंबरला ३१.९ किमान १०.५, १६ डिसेंबरला कमाल ३२.२, तर किमान ९.० अंश सेल्सिअस, १७ डिसेंबरला कमाल ३१.९ आणि किमान ७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. तापमानातील या बदलामुळे रत्नागिरी जिल्हा थंडीने चांगलाच गारठला आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आमदारांचे लॉबींग
जिल्ह्यात थंडीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाल्याने कोकणातील आंबा काजू बागायतदार सुखावला आहे. थंडीमध्येच आंबा काजू या बागायतीला मोहर येण्यास सुरुवात झाल्याने यावर्षी आंबा काजूचे उत्पादन चांगले मिळण्याची आशा बागायतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर जमिनीवर आंबा बागायतदार आंब्याचे उत्पन्न घेताहेत. जिल्ह्यातील १२५ लाख बायतदार आंबा आणि काजूचे उत्पादन घेत आहे. मात्र दरवर्षी बदलणाऱ्या वातावरणमुळे आंबा आणि काजू व्यावसायाला मोठा फटका सहन करावा लागतो. मात्र यावर्षी थंडीचे प्रमाण आंबा काजू बागायतीला पोषक असल्याने या बागायतीमधून चांगले उत्पादन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.