मुंबई- मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ अरबी समुद्रात एक फेरी बोट उलटल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. या अपघातात बोटीवरील 80 प्रवासी पाण्यात पडले होते. त्यातील 66 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला.
नीलकमल नावाची फेरीबोट नेहमीप्रमाणे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून एलिफंटा लेण्यांकडे जाण्यासाठी निघाली होती. या बोटीमध्ये 80 प्रवासी होते. फेरीबोट 5 ते 7 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतर नेव्हीची एक स्पीड बोट त्याठिकाणी आली. सुरुवातीला नेव्हीच्या बोट फेरीबोटला राउंड माऊन निघून गेली. फेरी बोटपासून काही अंतरावर नागमोडी वळण घेत गेली. परंतु, नेव्हीची बोट परत वेगाने फेरी बोटीकडे आली आणि मधोमध जोराची धडक दिली. स्पीड बोटीची धडक जोरात बसल्याने फेरी बोटीचे मधोमध दोन तुकडे झाले आणि प्रवासी पाण्यात पडले.
नेव्हीच्या स्पीड बोटमध्ये एकूण 6 जण होते. परंतु, या 6 जणांचे काय झाले, याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही. ही बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडियन नेव्हीकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार…
एका प्रत्यक्षदर्शीने एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘मी दुपारी 3.30 वा. ही बोट पकडली. 10 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर एका स्पीडबोटने आमच्या बोटीला धडक दिली. त्यानंतर आमच्या बोटीत पाणी शिरू लागले. त्यावेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला लाईफ जॅकेट घालण्याची सूचना केली. मी वरुन खाली येऊन जॅकेट घालेपर्यंत बोटीत पाणी शिरले होते. मी जवळपास 15 मिनिटे समुद्रात पोहत होतो. तोपर्यंत दुसरी बोट आली आणि आम्हाला वाचवले. स्पीडबोटमध्ये जवळपास 8 ते 10 माणसे होती. मी माझ्या बोटीच्या वर होतो. ही धडक मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. आमच्या बोटीमध्ये लहान – लहान मुले होती. आम्हाला सुरुवातीला लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते. पण जेव्हा बोटीत पाणी आले तेव्हा ते देण्यात आले. त्या स्पीडबोटीमधील एका व्यक्तीचा पाय देखील तुटला आणि एकाचा मृत्यू झाला.’
नेव्हीच्या स्पीडबोटचा ताबा सुटल्याने दुर्घटना…
दरम्यान, “इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना वाचवले आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येतील. तर मृतांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून मदत दिली जाईल,” असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदेंनी घेतला घटनेचा आढावा…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर व रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेचा आढावा घेतला. त्यांनी नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आदेश दिले.