सध्या उत्तर भारतात कमालीची थंडी पडली आहे. तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. राज्यातील चारही विभागातील जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. पुण्यात मंगळवारी ८ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहमदनगरमध्ये ५.६ एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये देखील पारा हा ८ अंशांवर आला आहे. पुढील काही दिवस नाशिक, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सर्व भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. उत्तर भारतात तर मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, एक कमी दाबचे क्षेत्र नैऋत्य बंगालच्या उपसागरावर स्थित आहे. तसेच पुढील दोन दिवसात त्याची तीव्रता वाढून ते तमिळनाडू किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये पुढील ५ ते ६ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात ३ ते ४ डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यात पुढील तीन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० ते २३ डिसेंबर पर्यंत आकाश मुख्यत: निरभ्र राऊत दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.
उत्तर भारत गारठला!…
थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील डोंगराळ आणि मैदानी भागातील रोजच्या जीवनावर परिणाम झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. श्रीनगरमध्ये सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्री उणे ५.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हे सर्वात थंड ठिकाण ठरले असून या ठिकाणी तापमान उणे ६.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. काझीगुंड येथे उणे ६.० अंश सेल्सिअस तर गुलमर्ग येथे उणे ४.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मात्र, दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक ७ ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. अशीच थंडीची लाट २० डिसेंबरपर्यंत कायम राहील, तर २१-२२ डिसेंबरला उंच भागात हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उत्तर भारतातील राज्यांबद्दल बोलायचे झाले तर हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात थंडीची लाट वाढली आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तापमान शून्याच्या खाली राहिले, तर मैदानी भागात पंजाबच्या आदमपूरमध्ये पारा १ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. धुक्यामुळे हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात दृश्यमानता ५० ते २०० मीटरपर्यंत मर्यादित होती.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये २१ डिसेंबर पर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा-चंदीगडमध्ये देखील थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्लीत हलके ते मध्यम धुके आणि धुके पडण्याची शक्यता आहे. येथील किमान तापमान ५ ते ८ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २० ते २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. धुक्यामुळे हवाई आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
दक्षिण भारतात पावसाची शक्यता…
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तामिळनाडू, दक्षिण भारतातील पुद्दुचेरी आणि रायलसीमा येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू आणि रायलसीमा मध्ये आज १८ डिसेंबर रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शहरी भागात पाणी साचण्याची आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आणि यानममध्ये १८-१९ डिसेंबररोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि ओडिशामध्येही हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.