वॉशिंग्टन- अमेरिकेत गेल्या महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. या निवडणुकीच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी उद्योगपती एलॉन मस्क यांनी जोरदार प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या विजयासाठी फक्त प्रचारच केला नाही, तर त्यांच्या विजयासाठी मस्कनी २२०० कोटी रुपये खर्च केले आहेत.
ट्रम्प यांच्यासाठी २२०० कोटी खर्च
नुकत्याच समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या एलॉन मस्क यांनी, डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्यासाठी स्थापन केलेल्या अमेरिका PAC या राजकीय कृती समितीला, २३९ दशलक्ष डॉलर्स (२२०० कोटी) देणगी दिली आहे.
ट्रम्प यांची प्रतिमा बदलण्यासाठी २०० दशलक्ष डॉलर्स देणगी
या व्यतीरिक्त एलॉन मस्क यांनी RBG PAC या संस्थेलाही २० दशलक्ष डॉलर्स इतकी देणगी दिली होती. या संस्थेने गर्भपाताबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिगामी प्रतिमा बदलण्यासाठी काम केले होते. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार मस्क यांनी दिलेल्या या देणगीनंतर त्यांनी टिम मेलन यांना मागे टाकले आहे. त्यांनी ट्रम्प यांना २०० दशलक्ष डॉलर्स इतकी देणगी दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मस्क यांना मोठी जबाबदारी
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील वियजानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांना अमेरिकन सरकारच्या ‘डोज’ विभागाची जबाबदारी दिली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारसाठी नवा विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या विभागाचे नाव DOGE (Department of Government Efficiency) असे आहे. मस्क यांच्यासह या विभागामध्ये विवेक रामास्वामी यांचाही समावेश करण्यात आला आहे. हा विभाग सरकारी सरकारचा खर्च कमी करण्यावर काम करणार आहे.
ट्रम्प यांचे दमदार पुनरागमन
आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष होणार आहेत. १२० वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्या टर्मनंतर पराभूत होऊन पुन्हा अध्यक्ष होण्याचा विक्रम डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडेन यांच्यात लढत होणार होती. पण, अखेरच्या क्षणी जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर उपाध्यक्ष कमला हॅरिस मैदानात उतरल्या होत्या. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावर विजय मिळवत दमदार पुनरागमन केले.