मुंबई- विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार आहेत. राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते.
विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय पक्षाचा…
भाजपचे नेते कालिदास कोळंबकर म्हणाले की, माझा पक्षाकडून आज मला हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगितले आहे. मी आज शपथ घेणार आहे, असे त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत पक्ष निर्णय घेईल. मी माझी इच्छा देवेंद्र फडणवीसांकडे व्यक्त केली आहे.
*
9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड…
सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून भाजपच्या कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष पद भूषवणार आहेत. पुढील तीन दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी राहील. पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देतील. 9 डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होईल. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल.
विरोधी पक्षनेता नसण्याचे संकेत…
विरोधकांकडे नियमानुसार अपेक्षित संख्याबळ नसले तरी मविआतर्फे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाणार आहे, असे निदर्शनास आणून दिले असता फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांचा असतो. तो सरकारचा निर्णय नसतो. त्यामुळे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. लोकसभेतही 10 वर्षे विरोधी पक्षनेतेपद नव्हते तरीदेखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला लोकसभेने विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार दिले होते. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला तर तोही मान्य असेल.