रत्नागिरी, दि. 3 (जिमाका)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जिल्हा, तालुका व गावस्तरावरील सर्व शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/ महामंडळे/शिक्षण संस्था/महाविद्यालये/शाळा यांच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे जाहीर आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.
राज्यघटनेचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 6 डिसेंबर, 1956 रोजी महापरिनिर्वाण प्राप्त झाले. महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा, गांभीर्याने पालन करावयाचा दिवस असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादनाचा कार्यक्रम सुस्थितीत होण्याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते व संबंधित शासकीय विभाग यांची बैठक श्री. घाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली.
बैठकीला कोकण रेल्वेचे क्षेत्रीय यातायात प्रबंधक शैलेश आंबडेकर, आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) संदीप पाटील, वाहतूक पर्यवेक्षक राज्य परिवहन महामंडळ दीपक भोसले, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. अंकुश शिरसाट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे रत्नागिरी जिल्हा विभाग कार्याध्यक्ष जे.पी. जाधव, पदाधिकारी केतन पवार, सुधाकर कांबळे तसेच अध्यक्ष, लांजा तालुका बौध्दजन संघ लांजा संतोष पडवणकर, तालुकाध्यक्ष आर.पी.आय. विलास कांबळे हे उपस्थित होते. बैठकीमध्ये श्री.घाटे यांनी संबंधित शासकीय विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला व उपरोक्त संघटनांच्या विविध मागणीनुसार कार्यवाही तात्काळ करण्याबाबत निर्देश दिले.